राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस, पुढील 3 तास धोक्याचे, हवामान विभागाचा अंदाज काय?

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार वारे आणि अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे मुंबई लोकल विस्कळीत झाली आहे. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यातच आता हवामान विभागाने मुंबईसह महाराष्ट्राला सतकर्तचा इशारा दिला आहे. पुढील काही तासांमध्ये अधिक पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ तासांत जोरदार वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत ५०-६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानंतर नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. तसेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ज्या प्रवाशांना अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे लागत आहे, त्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन त्यानुसार तयारी करावी. रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी, प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो, अशीही सूचना प्रशासनाने केली आहे.

रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. नागोठणे, रोहा, पाली या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि वारे वाहत आहेत. कल्याण-डोंबिवलीत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कल्याण पूर्वेकडील रचना पार्क परिसरात एक झाड कोसळले. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कल्याण पूर्व चिंचपाडा रोड परिसरात एक झाड रिक्षावर कोसळल्याने दोन वृद्ध प्रवासी अडकले आहेत. अग्निशामक दल आणि स्थानिक नागरिक त्यांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. दहिसर पूर्वेकडील दलवी कंपाऊंड, बलिराम इंडस्ट्रीसमोर एस. व्ही. रोडवर जोरदार वाऱ्यामुळे एक झाड कोसळल्याने वाहतुकीला आणि स्थानिक नागरिकांना त्रास झाला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)