पुण्याच्या मुळशी येथील गावात राहणारी विवाहीत महिला वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने सर्वत्र खळबळ माजली आहे. संपूर्ण राज्यात या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. हुंड्याच्या हव्यासापोटी वैष्णवीच्या सासरच्यांनी तिचा छळ केला. या सगळ्याला कंटाळून तिने स्वत:ला संपवले असे म्हटले जात आहे. वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असणारे तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि पती सुशील हगवणे अजूनही फरार आहेत. आता हगवणे कुटुंबीयांची थोरली सून मयूरी जगतापने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने या प्रकरणावर बोलताना थेट महिला आयोगाकडे बोट दाखवले आहे.
काय म्हणाली रुपाली?
मयूरी म्हणाली, ‘माझ्या प्रकरणात महिला आयोगाने काही पावलं उचलली नाहीत या मागे राजकीय दबाव असू शकतो. पोलिसांवरती राजकीय दबाव असू शकतो. माझी एफआयआर घेताना ज्या पोलीस मॅडम माझ्याशी चांगलं बोलत होत्या, त्या दुसऱ्या दिवशी माझ्याशी अरेरावीची भाषा बोलत होत्या.’
वाचा: वैष्णवीचं बाळ कुटुंबीयांकडे कसं पोहोचलं? काकांनी दिली मोठी माहिती
पुढे ती म्हणाली, ‘मला तर वाटतं त्या चौघांनाही जन्मठेप झाली पाहिजे. वैष्णवीसारख्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. जगातील सर्वच मुली उलटं बोलू शकत नाही. किंवा उलटं उत्तरं देऊ शकत नाही. ज्या प्रकारे मी त्या त्रासाला कंटाळून मी बाहेर आले. तिला नाही निघता आलं. कारण तिच्या नवऱ्यामुळे तिला बाहेर निघता नाही आलं.
महिला आयोगाने आता काय भूमिका घेतली?
वैष्णवीच्या निधनानंतर या प्रकरणावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैष्णवी हगवणे या विवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेची दिनांक 19 मे 2025 रोजी स्वाधिकारे दखल घेतली असून राज्य महिला आयोगाने पुणे पोलिसांना याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असे चाकणकर यांनी सांगितलं. मात्र, हगवणेंची थोरली सून मयूरी जगताप हिने महिला आयोगाने ही भूमिका आधी घ्यायला हवी होती असे अप्रत्यक्ष म्हटले आहे.