लाडकी बहीण योजनेमुळे तर 2027 पर्यंत… कैलास गोरंट्याल यांचा दावा काय?

गेल्या जूनमध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती, ही एक सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे वर्षाला अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत असल्याची चर्चा आहे. तसेच सरकार इतर योजनांचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. पीक विमा योजनेवर प्रतिक्रिया देताना लाडकी बहीण योजनेमुळे तर 2027 पर्यंत कोणतंही काम येणार नाही, आणि होणारही नाही, असं कैलास गोरंट्याल यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले गोरंट्याल? 

पिक विमा बोगस आहे. मी अधिवेशनामध्ये सुद्धा बोललो होतो की पिक विमा योजनेमध्ये गैरप्रकार झाला. ज्या माणसाला शेती नाही त्याला पैसे भेटतात आणि ज्याला खरी शेती आहे त्याला काहीच भेटत नाही. पिक विमा हे फार मोठं रॅकेट आहे. एक रुपयात पिक विमा ही तर फसवी योजना होती. लाडकी बहीण योजनेमुळे तर 2027 पर्यंत कोणतंही काम येणार नाही आणि होणारही नाही असा दावा कैलास गोरंट्याल यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मी पोलीस खात्यातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत बोललो तर मला अशी शंका यायला लागली, आमचे पगार पण येतात की नाही. एसटी महामंडळाच्या लोकांचे अर्धे पगार भेटलेच नाही अशी अवस्था सध्या आहे. त्यामुळे या सर्व फसव्या योजना आहेत आणि यामुळे सर्व काही त्यांच्या अंगावर येणार आहे. त्यामुळे याला जबाबदार त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेच आहेत असा आरोप गोरंट्याल यांनी केला आहे.

खोटं बोलून, लाडकी बहीण योजनेचं लॉलीपॉप दाखवून ते सत्तेवर आले, 2100 रुपये बोलले होते, परंतु पंधराशे रुपये सध्या नीट देत नाहीत. काट छाट सुरू झालेली आहे. 2 कोटी 30 लाख महिलांनी याचा फायदा घेतला, त्यामुळे तेवढे मतदान यांना फुकट भेटले असा हल्लाबोल यावेळी गोरंट्याल यांनी केला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)