विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अडीच महिन्यांतच महायुतीच्या एका नेत्याला राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांना काल राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड आहे. तो धनंजय देशमुख यांचा निकटवर्तीय असल्यानेच मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र याच मुद्यावरून आता अंजली दमानिया यांनी तोफ डागली आहे. एक घाण गेली, दुसरी घाण येते हे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यामध्ये यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यावेळी छगन भुजबळ यांचा समावेश झाला नव्हता. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याच वेळी छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती. मात्र आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याने त्यांच्या जागी भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान मिळू शकतं. याच मुद्यावरून अंजली दमानियांनी रोखठोक भूमिका मांडली.
काय म्हणाल्या अंजली दमानिया ?
एक घाण गेली, दुसरी घाण येते हे दुर्दैवी आहे. ज्यांनी महाराष्ट्र सदनचा घोटाळा केला त्यांना मंत्रीपद कसं देऊ शकतात असा सवाल अंजली दमानियांनी उपस्थित केला. एवढेच नव्हे तर, जर छगन भुजबळांना मंत्रीपद दिलं तर कोर्टात जाऊन त्यांची बेल रद्द करण्याची मागणी करणार असल्याचेही दमानियांनी सांगितलं. त्यामुळे छगन भुजबळांना मंत्रीपद मिळण्याच्या वाटेत मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यताही आहे.
गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वारगेटसारखे प्रकरण केल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी आज प्रसार माध्यमांसमोर केला. ते एक विकृत मंत्री असल्याची घणाघाती टीका राऊतांनी केली. त्यावरही दमानियांनी टीका केली आहे. जयकुमार गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे असं अंजली दमानिया म्हणाल्या. पीडित महिलेसोबत आपण स्वतः राज्यपालांकडे जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. विकृत व्यक्तींना मंत्रीमंडळात स्थान देऊ नका असी भूमिकाही दमानियांनी घेतली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात अंजली दमानिया अतिशय आक्रमर झाल्याचं पहायला मिळत आहे.
असा मंत्री जर मंत्रिमंडळात बसत असेल तर त्याला तिथून दूर करणे हे सरकारचं कर्तव्य आहे आणि अशा लोकांना मंत्रिपदाची देण्याची काय गरज? चांगली लोकं सरकारला मिळत नाहीत का? म्हणजे चांगली लोकं महाराष्ट्रात नाहीत का? का असे शोधून शोधून एक एक नग त्या मंत्रिमंडळात भरलेत मला तोच प्रश्न पडतोय असा सवालही अंजली दमानिया यांनी केला.