महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते? शपथविधी कधी होणार? कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार? मुख्यमंत्र्यांबरोबर कोण कोण शपथ घेणार? उपमुख्यमंत्री किती असणार? या प्रश्नांची उत्तरे मिळू लागली आहे. महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा उद्या सोमवारी होण्याची शक्यता आहे. त्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेणार आहे. हा सोहळा राजभवनात होण्याची दाट शक्यता आहे. तूर्तास फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होणार आहे.
असा असणार महायुतीचा फॉर्म्युला
महायुतीत मंत्रिपदासाठीच्या वाटपासाठी एका फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे सध्या १३२ आमदार आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला २२-२४ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या ५७ जागा आल्याने त्यांच्या वाट्याला १०-१२ मंत्रिपदे येण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादी कांग्रेसला ४१ जागा आल्याने त्यांच्या वाट्याला ८-१० मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावर महायुतीचे प्रमुख तिन्ही नेते बसून चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली.
शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी सांगितले की, राज्यात त्रिमूर्ती सरकार आले आहे. तिघे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील. अजित पवार यांची भेट घेऊन आपण अभिनंदन केले. आता ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घ्यायला जाणार आहे. तिन्ही नेत्यांनी केलेल्या कामाचा हा विजय आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली होती. त्याला महाराष्ट्रामधून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना जनता मानते. हे पुन्हा एकदा जनतेने दाखवून दिले आहे. खरी शिवसेना कोणाची आहे त्याचा निकाल जनतेने दिला आहे, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी केलेल्या संविधानचा प्रचार जनतेने ओळखला. त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. महायुतीच्या या यशामागे राहुल गांधी यांचे देखील मोठे योगदान आहे, असे केसरकर यांनी म्हटले.