दोन ठाकरे एकत्र येणार… पवार कुटुंबात एकोपा वाढतोय… शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय?

गेल्या चार दिवसापासून राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी एकत्र येणार असल्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याच्या वृत्ताचं जोरदार स्वागत केलं जात आहे. तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार हे सुद्धा एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार आणि अजितदादा यांच्यात झालेल्या बंद दाराआडील चर्चेनंतर या चर्चेला अधिकच उधाण आलं आहे. या सर्व चर्चांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अखेर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार हे मीडियाशी संवाद साधत होते. तुमच्यात आणि अजित पवारांमध्ये बंददाराआड चर्चा झाली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे का? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी थेट उत्तर दिलं. जनतेच्या कामासाठी एकत्र आलो होतो. ऊस आणि उत्पादनवाढीसाठी आम्ही काम करतो. त्यात सरकार आलं पाहिजे ही आमची भूमिका होती. त्यामुळे सरकार प्रतिनिधीशी बोलणं त्यात काहीही चुकीची गोष्ट नाही, असं शरद पवार म्हणाले.

एआयची सुरुवात बारामतीतून

एआयची सुरुवात बारामतीतून केली. आम्ही वर्ष दीड वर्षापासून अभ्यास करत होतो. हे तंत्रज्ञान शेतीला उपयोगी आहे. अनेक क्षेत्राला उपयोगी आहे. मेडिकल, इंजिनियरिंग, फायनान्सला उपयोगी आहे. पण आमचा इंटरेस्ट कृषीमध्ये आहे. आम्ही त्याची सुरुवात ऊसापासून केली. ऊस अधिक पाणी घेणारं पीक आहे. त्यानंतर ऊसाचा कालावधी 11 महिन्यापर्यंत मिळतो. ऊसासाठी लागणारं खत 30 ते 35 टक्के वाचते. आणि जमिनीचा पोत कायम राहतो. त्यामुळे कृषीसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचं आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

सरकार पाच पिकं घेणार

हे तंत्रज्ञान बघण्यासाठी अधिकारी आले होते. उपमुख्यमंत्री आले होते. त्यांनी पाहिलं. शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान आवश्यक आहे. आम्ही सुरुवात ऊसापासून केली आहे. त्यात तुम्ही पुढाकार घ्यावा, असं आवाहन आम्ही सरकारला केलं. पण सरकारने आणखी पाच पिकं घेणार असल्याचं सांगितलं. उपमुख्यमंत्र्यांनी तसं जाहीर केलं. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. याचा आम्हाला आनंद आहे, असंही ते म्हणाले.

दोन महिने जपून

राज्यात पाणीसाठा अत्यंत कमी आहे. त्यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्या मते 43 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. यापूर्वीही दोन तीनदा असं झालं होतं. शेतकरीही पाण्याचा जपून वापर करतील अशी खात्री आहे. मे महिना आणि जून महिना हे दोन महिने काढायचे आहेत. काळजीपूर्वक पावलं टाकली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

त्यावर कसं भाष्य करू?

ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. त्यावरही शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी त्याची माहिती मला माहीत नाही. मी त्यांच्याशी बोललो नाही. त्यावर मी कसं भाष्य करू? असा सवाल केला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)