निलेश चव्हाण याला पोलीस कोठडी, कोर्टात नेमके काय घडले?

पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप असणाऱ्या निलेश चव्हाण याला पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शिवाजीनगर न्यायालयाने दिले. शुक्रवारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमध्ये अटक करुन पुण्यात आणले होते.

निलेश चव्हाण हा गेल्या नऊ दिवसांपासून फरार होता. त्याच्या शोधासाठी सहा पथके रवाना झाली होती. अखेर शुक्रवारी त्याला नेपाळ सीमेजवळ अटक करण्यात आले. त्यानंतर विमानाने पुण्यात आणण्यात आले. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्यावर शनिवारी सकाळी १० वाजता पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात आणले. पोलिसांनी निलेश चव्हाण याला पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी कोर्टात केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

निलेश चव्हाण यांच्याकडे वैष्णवी यांचे बाळ गेले कसे? त्याचा तपास करायचा आहे. तसेच कस्पटे कुटुंबियांना धमकवण्यासाठी त्याने बंदूक वापरली होती. ती बंदूक जप्त करायची आहे. निलेशकडे हगवणे कुटुंबियांचे मोबाईल आहे, ते मिळवायचे आहेत. त्यामुळे पाच दिवसांची कोठडी पोलिसांनी मागितली. मात्र न्यायालयाने ३ जूनपर्यंत कोठडी दिली आहे.

निलेश चव्हाणचा मोबाईल जप्त करायचा आहे, त्याचा ऑडिओ रेकॉर्ड करायचा आहे, असे पोलिसांनी म्हटले होते. त्यावर आरोपीच्या वकिलांनी म्हटले फक्त मोबाईल जप्त करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. आरोपी दोन्ही कुटुंबांचा नातेवाईक नसताना त्याच्याकडे बाळ कसे गेले, असा प्रश्न सरकारी वकिलांनी उपस्थित केला. त्यावर आरोपीच्या वकिलांनी म्हटले, निलेश चव्हाण याचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. पुरावे तयार केले जात आहेत. या प्रकरणात निलेशची भूमिका काय हे अद्याप सिद्ध झाले नाही, असे आरोपींच्या वकिलांनी म्हटले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)