‘तुमचे रणगाडे, प्लेन, मिसाईल हे खपवण्याकरता…,’ काय म्हणाले उदयनराजे भोसले ?

आजची परिस्थिती बघून बघून मला मानसिक त्रास होतोय..राष्ट्रांमध्ये कोणी या बाजूला राहतं. कोणी त्या बाजूला राहतं. फाळणी का झाली माहित नाही? त्या वेळेच्या नातेवाईकांना विचारावे लागेल, कोणी फाळणी केली हे मला माहित नाही, त्याचं संशोधन तुम्ही करा. कुणाला काही प्राईम मिनिस्टर व्हायचं. त्यावेळेस किती जीव गेले, लोक मरताना बघताना वाईट वाटतं, कित्येक जण म्हणतात ही कुठली पद्धत आहे. कुणीतरी कुणाच्या तरी आईचा मुलगा आहे, त्यांना कसं वाटत असेल मला सांगा..? असे भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोलापूरात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

उदयनराजे भोसले पुढे म्हणाले की, हा वाद मिटवण्यासाठी जागतिक पातळीवर चर्चा घडवून आणल्या तर त्या चर्चेला मी जाईन. बोललो तर सगळ्यांना वाटतं, मी बोलतो म्हणून…तुमचे रणगाडे, प्लेन, मिसाईल हे खपवण्याकरता तुम्ही हे करता का काय.? आज किती लोकांचा जीव जातोय आपण पाहतोय. एक एक वेळेस डोकं काम करायचं बंद होतं. त्या ठिकाणी बॉर्डरवर आपल्या कुटुंबातील कोण गेलं तर कसं वाटेल? जगात कोणी असू द्या, थोडं शांत बसून, आत्मचिंतन करून विचार केला पाहिजे इथं आपण काय करतोय.? याचे उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे असेही ते म्हणाले.

दहशतवादी कसे निर्माण झाले..?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीबद्दल विचारले असता ते म्हणाले की हे डोंगर जेवढे दिसत आहेत ना ते तुम्ही आम्ही निर्माण केलेले नाहीत, पहिल्यापासून आहेत. हा निसर्ग आहे आणि निसर्गापेक्षा कोणी मोठे नाही. आज मला सांगा त्यावरून वाद सुरु आहे, कमाल आहे. दहशतवादी कसे निर्माण झाले..? का निर्माण झाले..? तुम्ही पत्रकार आहात तुम्ही विचार करा, का निर्माण झाले.? ज्याला दोन टाईम जेवण मिळत नसेल तो काय करणार ? त्यांची मुलं जर उपाशी राहत असतील तर काय करणार.?

मला मानसिक त्रास होतो…

हिंदू – मुस्लिम,हे आणि ते,सर्वांना उदंड आयुष्य लाभो. हॉस्पिटलमध्ये गेलात, कोणावर वेळ येऊ नये…पण त्यावेळेस तुम्ही काय विचार करत नाही ना… ते रक्त कोणाचे आहे. तुझा ब्लड ग्रुप काय ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, त्यामुळे जे चाललंय ते कोणालाही मान्य नाही. काही लोकांना मान्य असेल? मी त्या कुटुंबातील घटक आहे म्हणून हे बोलत नाही. परंतु मला तर हे अजिबात चालत नाही.. ते बघून बघून मला मानसिक त्रास होतो. छत्रपती शिवाजी महाराजांना हे अभिप्रेत होतं का.?

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)