‘या सरकारने सगळं ढिले….,’ दीनानाथ हॉस्पिटलप्रकरणी काय म्हणाले जयंत पाटील

दीनानाथ हॉस्पिटलमध्ये अनामत रक्कम न भरल्याने ईश्वरी ( तनिषा ) भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीनेही अनामत रक्कम मागितल्याचा ठपका प्राथमिक अहवालात ठेवला आहे. त्यानंतर आता राजकीय वातावरण आणखीच तापले आहे. या रुग्णालयांकडून अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे देखील पुढे आले आहे, यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी या प्रकरणात राज्य सरकारवर खरपूस टीका केली आहे. जयंत पाटील यांनी अत्यंत शेलक्या शब्दात राज्य सरकारचे अक्षरश: वाभाडे काढले आहेत.

सरकारने सगळं ढिले सोडले आहे

पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलेच्या मृत्यूवरून जयंत पाटील यांनी सरकारवर तिखट भाषेत निशाणा साधला आहे. या सरकारचा व्यवस्थेवर अंकुश नाही. प्रशासनावर आणि पोलीसांवर देखील सरकारचा काही अंकुश राहिलेला नव्हताच. आता तर वैद्यकीय क्षेत्रावर देखील अंकुश राहिलेला नाही. सरकारने सगळं ढिले सोडले आहे, अशा शब्दात आमदार जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्र सोडले आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणी सरकारने आता टोकाची कारवाई करावी, अशी मागणी देखील जयंत पाटील यांनी केली आहे.

आपल्याला बाकीचे प्रश्नच आठवत नाहीत

देशातल्या अर्थव्यवस्थेला झटके बसत आहेत. महागाई वाढत आहे. शेअर मार्केट कोसळत आहे. पण या धक्क्यांवर देशात काहीही चर्चा होताना दिसत नाही,त्याऐवजी आपण हिंदुत्ववादीने एवढे प्रेरित झालो आहोत, की आपल्याला बाकीचे प्रश्नच आठवत नाहीत असेही राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जगामध्ये टॅरिफचा विषय सुरू आहे. देशात इंधन, गॅस दर वाढलेला आहे,दररोज शेअर मार्केट कोसळत आहे,हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, असं देखील जयंत पाटील यावेळी म्हणाले, ते सांगलीवाडी या ठिकाणी आयोजित जयंत बैलगाडी शर्यतीच्या कार्यक्रमावेळी बोलत होते.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)