Viashnavi Hagvane case : वैष्णवी हगवणे प्रकरणात रुपाली चाकणकर यांची पहिली प्रतिक्रिया काय?; काय म्हणाल्या?

राज्यात हुंडाबंदीच्या विरोधात कायदा असूनही आजच्या काळातही अनेक महिलांचे बळी जात आहेत. पुण्यातील वैष्णवी हगवणेची आत्महत्या हे त्याचंच एक ताजं उदाहरण. पदरात 9 महिन्यांचं बाळ असलेल्या वैष्णवीने सासरच्या लोकांच्या छळाला, मारहाणीला, पैशांच्या मागणीला कंटाळून गेल्या आठवड्यात तिचं जीवन संपवलं. याप्रकरणामुळे राज्यभरातील नागरीक संतापले असून हगवणे कुटुंबाचे एकेक कारनामे समोर आल्यावर डोक्याची शीर अगदी तडकत्ये. याप्रकरणात फरार असलेले वैष्णवीचे सासरे आणि दीर यांना अटक झाली. तिचे पती, नणंद आणि सासू आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्यावर मकोका लावून कठोर शिक्षा द्या, माझ्या मुलीला न्याय द्या अशी मागणी वैष्णवीचे आईृवडील, कस्पटे कुटुंबीय करत आहेत.

हे प्रकरण तापलेलं असतानाच विविध राजकीय प्रतिक्रियाही समोर येत आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया देत भूमिक मांडली. वैष्णवी संदर्भात आयोगाकडे तक्रार नव्हती. पण आयोगाने स्वत स्युमोटो घेऊन या घटनेला वाचा फोडली. या प्रक्रियेत तपास अधिकाऱ्याने चांगला तपास केला आहे असे त्यांनी नमूद केलं.

रुपाली चाकणकर यांनी काय सांगितलं ?

मला घटना समजल्यावर आयोगाच्या वतीने मी 19 तारखेला स्युमोटो दाखल केला होता. ती तक्रार बावधन पोलिसांकडे पाठवली होती. तक्रार दाखल झाली, त्यानंतर गुन्हाही नोंद झाला होता. मी आज कस्पटे कुटुंबाशी बोलले. त्यांनी हगवणे कुटुंबाविरोधात अजून काही गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे. त्यानुसार सप्लिमेंटरी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, असे चाकणकर यांनी सांगितलं.

आधई तीन आरोपी अटकेत होते, आज सासरे आणि दीर अशा 2 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांची टीम कार्यरत असते. सायबर आणि क्राईमची टीमही सक्रिय होती. बाळा संदर्भातील घटनाक्रम किंवा यात काय घडलं, वैष्णवीच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यापूर्वीची माहिती दिली आहे.

ही घटना घडल्यापासून अनेक गोष्टी विचारल्या जातात. 6/11/2024 रोजी करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाला मेल केला होता. हा मेल होता रात्री पाठवलेला. ११ वाजून ५० मिनिटांनी मेल आला. हा मेल आल्यावर पोलिसांना पाठवून त्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांचे भाऊ, भावजय आणि घरातील लोकांच्या विरोधात तक्रार होती.

मयुरी जगतापच्या भावानेही महिला आयोगाकडे केला मेल

त्यानंतर 6 नोव्हेंबर 2024 रोजीच मयुरी हगवणेचा भाऊ मेघराज जगतापने आमच्याकडे तक्रार केली होती. ती तक्रार केल्यानंतर आम्ही त्यानुषंगाने 7 तारखेला 11.30 वाजता या दोन्ही तक्रारी बावधन पोलिसांना पाठवून कारवाई करण्यास सांगितलं. तक्रारदार आणि पोलिसांनाही पत्र पाठवलं होतं. 6 नोव्हेंबर रोजी 485 ची एफआयआर दाखल झाली होती. एक करिश्मा हगवणेची आणि दुसरी मेघराज जगताप यांचीही एफआयआर घेण्यात आल्या. बावधन पोलिसांनी या दोन्ही वेगवेगळ्या तक्रारी घेतल्या होत्या. क्रॉस कम्प्लेंट होत्या. तक्रारदार हे कुटुंबातीलच असल्याने कौटुंबिकवाद कौन्सिलिंग करून मिटवले जाते. त्यानुसा कुटुंबातील लोकांना कौन्सिलिंगसाठी बोलावलं होत, असं त्यांनी सांगितलं.

आयोगाने स्वत: या घटनेला वाचा फोडली.

वैष्णवी संदर्भात आयोगाकडे तक्रार नव्हती. पण आयोगाने स्वत: स्युमोटो घेऊन या घटनेला वाचा फोडली. या प्रक्रियेत तपास अधिकाऱ्याने चांगला तपास केला आहे. या सर्व घटनेत अधिक गुन्हे दाखल करण्याची मागणी पालकांनी केली आहे. पोलिसांना तशा सूचना दिल्याचे चाकणकर म्हणाल्या.

चिल्लरचा मोठा आवाज आला त्यामुळे उत्तर द्यावे लागते

हुंडाबंदीच्या विरोधातील कायदा आहे. गर्भनिदानचा कायदा आहे. तरीही असे गुन्हे का घडतात. नागपूरमध्येही काल हुंड्यासाठी एका महिलेने आत्महत्या केली. हुंडा मागितल्याने मुली आत्महत्या करत आहेत. 35,971 केस माझ्या मुख्य कार्यालयात आल्या आहेत, त्यापैकी 35282 निकाली काढल्या आहेत. आयोग काय करतो असं लोकांना वाटतं त्यांच्यासाठी हा डेटा आहे. मला हे सांगायची गरज नव्हती. पण गेल्या दोन दिवसात चिल्लरचा मोठा आवाज आला त्यामुळे उत्तर द्यावे लागते, असं म्हणत चाकणकरांनी विरोधकांना टोला हाणला.

जे लोकं आयोगाशी संबंधित नाही. त्यांना प्रश्न विचारल्यावर ते मोठी उत्तर देतात. त्यांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळे तुम्ही आयोगाला माहिती विचारा, असंही त्या म्हणाल्या.

यशोमती ठाकूर या माजी महिला मंत्री आहेत. मला त्यांना सांगायचं आहे, त्या माजी मंत्री आहेत, त्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे. काल सहा दिवसानंतर भानावर आल्यावर त्यांनी ट्विट केलं. ठाकूर यांच्या कार्यकाळात जे काम झालं. त्यांच्यापेक्षा राज्य महिला आयोग चांगले काम करत आहे, असे सांगत चाकणकरांनी त्यांना टोला लगावला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)