मुख्यमंत्री पदासाठी बिहार मॉडल; राज्यात का नापास हा फॉर्म्युला? शिंदे सेनेच्या मागणीत अडचणी काय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची लाट दिसली. महाविकास आघाडी सपशेल फेल ठरली. आता महायुतीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सध्या स्पर्धा सुरू आहे. कोण बाजी मारणार हे वेळच ठरवणार. पण सध्या राज्यात बिहार पॅटर्नचे कवित्व सुरू आहे. राज्यातील भाजपातील आमदार देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आग्रही भूमिका मांडत आहे. सर्वाधिक जागा आल्याने ही मागणी करण्यात येत आहे. तर शिवसेना शिंदे सेनेने पण या पदासाठी दावा सांगितला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात गेल्या अडीच वर्षात अनेक योजना राबवल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे.

बिहार पॅटर्न राज्यात का फेल?

भाजपा प्रवक्ते प्रेम शुक्ला यांच्या मते बिहार मॉडेल महाराष्ट्रात लागू होऊ शकत नाही. बिहारच्या निवडणुकीपूर्वी भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले. पण राज्यात असा कोणताही दावा दोन्ही गटांनी केला नव्हता. अथवा शिवसेनेला असे कोणतेही आश्वासन देण्यात आले नव्हते, असे भाजपाने स्पष्ट केले आहे.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणार असे कोणतेही आश्वासन देण्यात आले नसल्याचे प्रेम शुक्ला यांनी सांगीतले. निवडणूक प्रचारात सुद्धा निकालानंतर मुख्यमंत्री निवडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्याची आठवण शुक्ला यांनी करून दिली. राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री पदावर नियुक्त केले आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला 132, शिवसेनेला 57 आणि एनसीपीने 41 जागांवर विजय मिळवला. महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत महायुती सत्तेत परत आली आहे. त्यातच आता महाविकास आघाडीने ईव्हीएमवर खापर फोडले आहे.

शिंदे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

सोमवारी शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री पदासाठी बिहार पॅटर्नचा राग आळवला. एकनाथ शिंदे यांना सीएम करण्याची मागणी केली. 132 जागांवर घवघवीत यश आल्याने भाजपाचा मुख्यमंत्री असावा आणि एकनाथ शिंदे यांना आता मन मोठं करावं, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून कोण मुख्यमंत्री होणार यावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या नेतृत्वात एकत्रित निवडणूक लढवली आहे आणि महायुतीचा मुख्यमंत्री होईल असे ते म्हणाले. त्यांनी मुंबईत समर्थकांना एकत्र न येण्याचे आवाहन केले. त्यामुळे शिंदे यांनी वातावरण निवळण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याचे दिसते.

मग उशीर का?

जर महायुतीत सर्वच अगोदर ठरले असेल तर मग मुख्यमंत्री कोण असेल, कोणत्या पक्षाचा असेल, याचे उत्तर काय असेल ते समोर यायला का उशीर होत आहे, याची चर्चा रंगली आहे. शिवसेनेने त्यांच्या विधिमंडळातील गटनेत्याची निवड केली आहे तर तिकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने सुद्धा ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर भाजपाने मात्र अजून विधिमंडळातील गट नेत्याची अद्याप निवड केलेली नाही. मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर आल्यानंतर कदाचित ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)