मुंबईतील पहिला ‘फॉरेस्ट वॉकवे’ पर्यटकांसाठी सुरू, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये?

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात निसर्गाचा श्वास घेता येईल अशी जागा सापडणं दुरापास्त मानलं जातं. मात्र, आता मुंबईकरांसाठी अशीच एक खास जागा खुली करण्यात आली आहे. या ठिकाणाचे नाव आहे एलिवेटेड नेचर ट्रेल, जी मुंबईच्या मलबार हिलवर बांधण्यात आलेली पहिली ट्रेल आहे. शांत आणि हिरव्यागार परिसरात सुमारे ४८५ मीटर लांबीचा हा वॉकवे कमला नेहरू पार्कपासून डोंगरवाडीच्या जंगलांपर्यंत पसरलेला आहे. सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा सुरू असून, निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण नव्या अनुभवाचं केंद्र ठरत आहे. या अनोख्या ट्रेलमध्ये अजून काय खास आहे, ते पाहूया.

प्रकृतीप्रेमींसाठी खास ट्रेल

सिंगापूरच्या प्रसिद्ध ‘ट्री टॉप वॉक’वरून प्रेरणा घेऊन ही ट्रेल उभारण्यात आली आहे. जंगलाच्या उंच झाडांमध्ये, सुमारे २० फूट उंचीवरून ही वॉकवे जाते. २.४ मीटर रुंद असलेली ही ट्रेल गुलमोहर, जांभूळ, बदाम, वड अशा झाडांनी वेढलेली आहे. त्यामुळे चालताना झाडांच्या सावलीत आणि पक्ष्यांच्या किलबिलाटात निसर्गसौंदर्याचा अनुभव घेता येतो.

पक्षीप्रेमींसाठी बर्डव्यू पॉइंट

या मार्गावर “बर्डव्यू पॉइंट” नावाचा विशेष भाग आहे. येथे बसून किंगफिशर, बुलबुल, टिया यांसारख्या विविध पक्ष्यांचे निरीक्षण करता येते. याशिवाय, ट्रेलवर एक काचेचे (ग्लास-बॉटम) व्यूइंग डेक आहे, ज्यातून खालील जंगल स्पष्टपणे दिसते. यामुळे येथे फिरणं हा केवळ चालण्याचा नव्हे तर जंगलातील जैवविविधतेचा अनुभवही ठरतो. काही वेळा येथे साप, सरडे आणि अजगरही पाहायला मिळतात.

समुद्राचं देखणं दृश्य

ही ट्रेल ज्या ठिकाणी संपते, तिथे “सी व्यूइंग डेक” आहे. येथून गिरगाव चौपाटी आणि अरबी समुद्राचं मनोहारी दृश्य पाहता येतं. हिरव्यागार झाडांमधून समुद्राकडे पाहणं हा एक वेगळाच अनुभव आहे. मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरात अशा ठिकाणी वेळ घालवणं म्हणजे मानसिक आणि शारीरिक ताजेपणाचा स्रोत ठरतो.

प्रवेश वेळ आणि शुल्क

ही नेचर ट्रेल दररोज सकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुली असते. भारतीय नागरिकांसाठी तिकीट शुल्क २५ रुपये असून विदेशी पर्यटकांसाठी १०० रुपये आकारले जाते. तिकीट ऑनलाइन बुक करता येते, त्यामुळे प्रवेश सुलभ आणि सोयीस्कर आहे. प्रवेशद्वार कमला नेहरू पार्कच्या मागे असलेल्या सिरी रोडवरून आहे, त्यामुळे ही जागा सहज गाठता येते.

नव्या पिढीसाठी प्रेरणा

शहरातील अशा हरित प्रकल्पांमुळे मुंबईकरांना निसर्गाशी जोडणारा एक सकारात्मक दुवा मिळतो. विशेषतः लहान मुलांना आणि तरुणांना पर्यावरणाबद्दल जागरूक करण्यासाठी अशा जागा उपयुक्त ठरू शकतात.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)