मुख्यमंत्रिपदावर अजितदादा हे काय बोलून गेले? थेट म्हणाले, मलाही वाटतं की…

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्रिपादाची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यांनी आतापर्यंत उमुख्यमंत्री होण्याची हॅटट्रिक केलेली आहे. मात्र त्यांना अद्याप मुख्यमंत्री होता आलेलं नाही. त्यांनी तसेच त्यांच्या पक्षातील नेतेमंडळींनी मुख्यमंत्रिपद मिळण्याबाबतची इच्छा अनेकवेळा बोलून दाखवलेली नाही. अजूनही त्यांची ही इच्छा पूर्ण झालेली नाही. दरम्यान, आता अजित पवार यांनी त्यांच्या याच इच्छेचा पुनरुच्चार केलेला आहे. त्यांनी केलेल्या विधानाची यावेळी मात्र चांगलीच चर्चा होत आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

अजित पवार हे मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. भाषणादरम्यान त्यांनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केलं. पत्रकार राही भिडे यांनी राज्याला महिला मुख्यमंत्री मिळाल्या पाहिजेत अशी आशा व्यक्त केली होती. हाच धागा पकडून त्यांनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केलंय. “राही भिडे म्हणाल्या की भविष्यात या महाराष्ट्रात एखादी महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं. पण शेवटी तो योग जुळून यावा लागतो. कारण मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठे जमतंय,” असं भाष्य अजित पवार यांनी केलं.

हा फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र, इथे नक्की…

तसेच, “पण राज्याला महिला मुख्यमंत्री मिळण्याचा योग कधीतरी जुळून येईल. पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रमाणे ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री झाल्या. हा फुले, शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे तो योगही राज्यात येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अजित पवार एकूण सहा वेळा उपमुख्यमंत्री

अजित पवार आतापर्यंत एकूण पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. सध्याची त्यांची सहावी वेळ आहे. ते सर्व प्रथम 2010 साली काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. 2012 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सरकारमध्ये त्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडली. नोव्हेंबर 2019 मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यावेळी ते फक्त 80 तासांसाठी उपमुख्यमंत्रिपदी होते.

पुढे 2022 साली महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले. ते पुढे अडीच वर्षे या पदावर होते. पुढे 2022 सालीच अजित पवार यांनी बंड केले आणि भाजपासोबत हातमिळवणी केली. यावेळी ते पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. आता महायुती सरकारमध्ये ते सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)