वाऱ्यांची चक्रीय स्थिती मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या परिसरामध्ये निर्माण झाली आहे. याच्या प्रभावाखाली उत्तर महाराष्ट्रात गुरुवारी काही ठिकाणी पावसाची हजेरी जाणवली. उत्तर कोकण वगळता सोमवारपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या २९ जिल्ह्यांमध्ये १६ मे पर्यंत ढगाळ वातावरणासाहित, किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी वर्तवला. या काळात गारपीट होण्याचीही शक्यता आहे. १२ मेपासून १६ मेपर्यंत कोल्हापूर, सांगली, धाराशीव, लातूर या जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊ शकते, असे ते म्हणाले.
रविवारपासून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. शनिवार आणि रविवारी धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यादेवीनगर येथे मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो; तर पुणे जिल्ह्यात सोमवारपर्यंत सातत्यपूर्ण मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. साताऱ्यामध्येही शुक्रवारपासून पावसाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर येथे शनिवार, रविवारी मेघगर्जनेसह जोरदार वारेही असू शकतील. सोमवारी हलका पाऊस असेल. नांदेड, लातूर, धाराशीव आणि विदर्भाच्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये सोमवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सोमवारी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहिल्यादेवीनगर, शिर्डी, बीड येथे मतदान होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये काही भागात पावसाची शक्यता असल्याने मतदानाच्या दिवशी पावसाचा फटका बसू नये, यासाठी मतदारांनीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.