Weather Update: मुंबईत रिमझिम, आकाशात ढगांची गर्दी, तर विदर्भाला ऑरेंज अलर्ट, पुढील तीन दिवस महत्त्वाचे

मुंबई: राज्यात पावासाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोकण, विदर्भात कालपासून मुसळधार पाऊस सुरु असून हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, शुक्रवारी सकाळी मुंबई शहरासह उपनगरात पावसाच्या सरी बरसल्या.

हवामान विभागानुसार (IMD), मुंबई आणि उपनगरीय भागात दुपारनंतर मध्यम स्वरुपाचा पाऊस किंवा रिमझिम पावसासह ढगाळ वातावरण कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत आजचं तापमान किमान २६ अंश सेल्सियस ते कमाल ३३ अंश सेल्सियस असेल. उत्तर-वायव्येकडून ३.७ किमी/तास वेगाने वारे वाहतील.

पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, कोकण, पुणे, साताऱ्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याशिवाय पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर विदर्भाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भाला पावसाचा ऑरेंज अलर्ट


मान्सून राज्यात दाखल होऊन २० दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटून गेला तरी विदर्भातील सर्व जिल्ह्यात अद्याप पाऊस पोहोचलेला नव्हता. मात्र, आता विदर्भवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील तीन दिवस विदर्भात जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज अमरावती, गडचिरोली, यवतमाळ आणि नागपुरात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील तीन दिवस म्हणजेच २३ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण विदर्भ व्यापेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवली, पालघरमध्ये धुवांधार पाऊस

गुरुवारी कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस बरसला. अवघ्या काही तासांच्या पावसातच कल्याण-डोंबिवलीत जागोजागी पाणी साचलं होतं. तर २०० पेक्षा अधिक घरांमध्ये पाणी शिरलं. रस्त्यावरही गुडघाभर पाणी साचलं होतं. तर पालघरमध्येही धुंवाधार सरी कोसळल्या, पावसामुळे पालघरमधील देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला होता.