Weather Update: मान्सूनचं जोरदार कमबॅक, ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, कुठे मुसळधार, कुठे हलक्या सरी

मुंबई: मान्सूनने राज्यात ब्रेक घेतल्यानंतर आत पुन्हा एकदा राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. दोन दिवसांपासून मुंबईसह काही भागात दमदार पाऊस सुरु आहे. तर हवामान विभागाने आज अनेक जिल्ह्यांना मुसळधार तर कुठे हलक्या सरींचा इशारा दिला आहे. मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरु आहे. तर, राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोकण, विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोकण, पुणे, सातारा या जिल्ह्यांतील काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात मान्सूनने हजेरी लावली असली तरी अद्याप संपूर्ण विदर्भात पावसाला सुरुवात झालेली नाही. अजूनही बरेच जिल्हे पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबईत हवामान खात्याने पावासाचा यलो अलर्ट दिला आहे. तर पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. पुढील दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मृगाचीही हुलकावणी

यंदा रोहिणी नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मृग नक्षत्रात दमदार पाऊस होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, उद्या नक्षत्र संपत आले तरी दमदार पाऊस झालेला नाही. इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर असूनही येथे अद्याप समाधानकारक व दमदार पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीच्या एकदोन तुरळक पावसांवर काही शेतकऱ्यांनी भाताचे बियाणे पेरले. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने चिंता वाढली आहे. दुसरीकडे दमदार पाऊसच नसल्याने पूर्व भागासह बहुतांश ठिकाणी पेरण्या रखडल्याचे चित्र आहे.

जूनच्या सुरुवातीलाच हवामान खात्याने समाधानकारक व सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता. प्रारंभी एक-दोन दिवस तुरळक पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाकडे लक्ष केंद्रीत केले. बियाणे, अवजारे खरेदी करून काही ठिकाणी भातबियाणे पेरले. मात्र, आठ ते दहा दिवस उलटूनही दमदार पावसाची चिन्हे दिसत नसल्याने आता शेतकरी चिंतेत सापडला आहे. एकीकडे धरणांनी तळ गाठला असताना शेतकऱ्यांनी पेरण्या करून ठेवल्या मात्र पाऊसच न झाल्याने सर्वच हतबल झाले आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून केवळ ढग भरून येतात. काहीसे वातावरण निर्माण होते. मात्र, हे वातावरण निवळते. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड होतो. खरिपाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदी करण्याची लगबग चालू आहे. महागडी खते व बियाणे घेऊन ठेवल्याने तसेच त्यात पावसाच्या भरवशावर अनेकांनी पेरणी करून ठेवली. मात्र, पावसाला सुरुवातच नसल्याने शेतकरी वर्गापुढे आर्थिक विवंचनेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.