मुंबई-उपनगरात पावसाची रीएन्ट्री
गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांतून पाऊस गायब झाला होता आणि नागरिकांना पुन्हा एकदा उकाड्याचा सामना करावा लागला. मात्र, सोमवारी पुन्हा एकदा पावसाने मुंबईसह उपनगरात हजेरी लावली. मुंबईसह कोकणातही जोरदार पाऊस बरसला. तर आज आणि उद्याही कोकणला मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडला मुसळधार पावसाचा इशारा
यादरम्यान, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यातही जोरदार पावसाच्या सरी कोसळतील.
पुणे, साताऱ्यालाही पावसाचा यलो अलर्ट
त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा येथेही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, विदर्भालाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातही मुसळधार पाऊस
पुढील पाच दिवसांत मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, लातूर नांदेड येथे जोरदार पाऊस होईल. तर विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, अकोला, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.