भारताला सर्जनशील महासत्ता करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासImage Credit source: social media
करमणूक क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारतासाठी विकासाचे नवे इंजिन आहे. भारताला सर्जनशील महासत्ता करणार असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर, बांद्रा कुर्ला संकुल, मुंबई येथे काल (1 मे) ‘वेव्ह्ज 2025’ ये आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या समिटचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपाल सीपी राधाकृष्णन, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार असे अनेक मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
“आजच्या डिजिटल युगात आशय (कंटेंट) हे सर्वात वेगाने पसरत आहे आणि महाराष्ट्र या सर्जनशील क्रांतीच्या केंद्रस्थानी आहे, ही परिषद ही केवळ एक घटना नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली चळवळ आहे. राज्य सरकार अॅनिमेशन, गेमिंग, म्युझिक आणि डिजिटल माध्यमांना चालना देण्यासाठी अनुकूल धोरणे राबवत आहे. मुंबईतील 500 एकरच्या फिल्मसिटीला नव्या पिढीच्या स्टुडिओ इकोसिस्टममध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. यातील 120 एकरमध्ये माध्यम व करमणूक शहर उभारण्यात येणार असून, अॅनिमेशन, VFX आणि गेमिंगसाठी हे केंद्र असेल”, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
भारताच्या ऑरेंज इकॉनॉमीचे 3 स्तंभ
या समिटच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. ” भारताच्या ऑरेंज इकॉनॉमीचे कंटेंट, क्रिएटिव्हिटी आणि कल्चर हे 3 स्तंभ असून काही वर्षांत जीडीपीमध्ये (सकल घरेलु उत्पन्न) याचा मोठा वाटा राहणार आहे”, असे ते म्हणाले. “जगातील अॅनिमेशन मार्केट 430 अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील 10 वर्षात ते दुप्पट होणार आहे. भारत अॅनिमेशन, ग्राफिक्स, गेमिंग आणि डिजिटल कंटेंटमध्ये मोठी झेप घेणार असून ही परिषद त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल. भारतीय चित्रपट आता 100 पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचले असून, परदेशी प्रेक्षक भारतीय कथा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, हे भारतीय कंटेंटचे यश आहे”, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केलं.
माणसाला यंत्र बनावयचं नाहीये तर..
आपल्याला माणसाला यंत्र बनवायचं नाहीये तर संवेदनशील करायचं आहे. संगीत, नृत्य, कला यांना महत्त्व द्यायला हवे, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी भारताला सर्जनशीलतेचे जागतिक केंद्र करण्याचे आवाहन केले. जग नव्या शैलीत कथा सांगत असताना, भारताकडे हजारो वर्षांचा सांस्कृतिक ठेवा आहे. त्याचे नव्या पिढीसमोर आकर्षक सादरीकरण करण्याचे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.
‘WAVES 2025’च्या निमित्ताने भारतामध्ये प्रथमच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ₹400 कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुदत्त, पी. भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक आणि सलील चौधरी यांच्या सिनेमातील योगदानाचे स्मरण करत विशेष टपाल तिकिटांचे अनावरण झाले.