भिमाशंकर देवस्थान दर्शन आणि वर्षा पर्यटनासाठी भिमाशंकर वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना अपघात प्रवण क्षेत्रामध्ये येत्या ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यटकांनी वर्षासहलींसाठी या भागात येऊ नये, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश वन विभागाने (वन्यजीव) प्रसिद्धीपत्रकाद्वारे काढले आहेत.
भिमाशंकर परिसरात वर्षभर देवस्थानात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठी असते, पावसाळ्यात पर्यटकही मोठ्या संख्येने निसर्गरम्य परिसरात फिरण्यासाठी, धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येतात. वनपरिक्षेत्र भिमाशंकर अभयारण्य भाग एक आणि भाग दोनमधील धबधब्यातील कुंडामध्ये भिजण्यासाठी स्थानिकांबरोबर सुट्टीच्या दिवशी पुणे मुंबईतून पर्यटक आवर्जून येत असतात. सध्या या धबधब्यांतील पाण्याला जोर असून, पोहताना पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्यास जीवघेणा अपघात होऊ शकतो.
भिमाशंकर वन्यजीव अभयारण्यातील डोंगरदऱ्यांमधील जंगलवाटा पावसामुळे निसरडया झाल्या आहेत, अनेक ठिकाणी गवत वाढल्याने वाटा पुसल्या गेल्या आहेत, अशा परिस्थिती अपघाताची, धुक्यामुळे वाट हरविण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन अभयारण्यातील सर्व निसर्गवाटा १ जुलै ते ३० सप्टेंबरदरम्यान पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक (वन्यजीव) तुषार चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, भिमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांनी अभयारण्यात फिरताना नियमांचे काटेकोर पालन करावे. परवानगीशिवाय अवैधरित्या अभयारण्यामध्ये प्रवेश करू नये, तसेच प्रतिबंधित क्षेत्रामध्ये विनापरवाना प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीव संरक्षण कायदयाअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
बंदी आणलेले धबधबे आणि लगतचे परिसर
कोंढवळ धबधबा – जाणारे सर्व मार्ग
चोंडीचा धबधबा – खोपीवली नियतक्षेत्र
न्हाणीचा धबधबा – पदरवाडी जवळ
सुभेदार धबधबा – नारीवली नियतक्षेत्र
घोंगळ घाट नाला- खांडस ते भिमाशंकर मार्ग
शिडी घाट- पदरवाडी ते काठेवाडी पुर्णतः बंद
लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात रविवारी झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ताम्हिणी घाट परिसरात एक ३२ वर्षीय तरुण पाण्यात वाहून गेला होता. तर कोल्हापूरमधील काळम्मावाडी धरण परिसरातील दूधगंगा नदी पात्रात पाय घसरून पडल्याने दोन तरुण वाहून गेल्याची घटना सोमवारी समोर आली.