मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांची पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर असून, दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने मुंबई महापालिकेने आधी पाच टक्के आणि त्यानंतर १० टक्के पाणीकपात लागू केली. त्यानंतर मुंबईतील अनेक भागांत पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबई महानगरात काही प्रमाणात पाऊस पडत आहे. धरणक्षेत्रातही संततधार सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात काही अंशी वाढ झाली आहे. ३० जूनपर्यंत सातही धरणांत ५.४६ टक्के पाणीसाठा होता. आता हाच साठा मंगळवारपर्यंत ७.१५ टक्के झाला आहे. सध्याच्या घडीला धरणांमध्ये १ लाख ३ हजार ५०३ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. सन २०२३मध्ये याच तारखेला २ लाख २२ हजार ८६८ दशलक्ष लिटर, तर सन २०२२मध्ये १ लाख ७० हजार ५२० दशलक्ष लिटर पाणीसाठा होता.
‘भातसा’मध्ये भर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातील राखीव कोट्यातील पाणीसाठ्याचा वापर करण्यात येत आहे. अप्पर वैतरणामध्ये ९१ हजार १३० दशलक्ष लिटर, तर भातसामध्ये १ लाख ३७ हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणा आणि भातसामधील नियमित पाणीसाठा शून्यावर पोहोचला होता. आता दोन दिवस झालेल्या पावसामुळे भातसा धरणातील पाणीसाठा वाढला असून तो दीड टक्का झाला आहे. भातसा धरणाची पाणीसाठवण क्षमता ७ लाख १७ हजार ३७ दशलक्ष लिटर आहे. आता त्याचा पाणीसाठा १० हजार ७६० दशलक्ष लिटरवर आला आहे.
सात धरणांतील पाणीसाठा (टक्के)
अप्पर वैतरणा – शून्य
मोडक सागर – २२.८१
तानसा – १९.३९
मध्य वैतरणा – १३.८४
भातसा – १.५०
विहार – २१.९२
तुळशी – २९.२४