जमीन खरेदीचे नियम धाब्यावर बसवले का?
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात भाषण करत असताना हा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, ”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात झाडाणी नावाचे गाव आहे. हे गाव आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील जमीन गुजरातच्या एका अधिकाऱ्याने अतिशय अल्प दरात खरेदी केली आहे. हा अधिकारी गुजरातच्या जीएसटी विभागाचा प्रमुख आहे. जमीन खरेदी करण्याचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले आहेत. या जमिनीकडे जाण्यासाठी काढण्यात आलेले रस्ते वनजमिनीमधून खोदून काढण्यात आले. या भागामध्ये रस्ते खोदताना महसूल विभागाची परवानगी घेण्यात आली नाही”.
कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला
वडेट्टीवार पुढे म्हणाले की,” मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात गुजरातच्या अधिकाऱ्याने राज्य शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला आहे. एवढी मस्ती,दादागिरी.. आम्ही जेव्हा पत्र पाठवले तेव्हा आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे गुजरातच्या जीएसटी अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार? खेड आणि मावळच्या दोन प्रांतांचे अधिकार काढण्यात आले आहेत”.
सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे झाला गोंधळ
विधानभवनात कामकाज सुरू असताना सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चांगलेच संतापले होते. वडेट्टीवार यांना महसूल विभागाच्या संबंधित प्रश्न विचारायचा होता. परंतु विषयाशी संबंधित मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विजय वडेट्टीवार यांनी सभागृहाचे कामकाज थांबवण्याची मागणी केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज पुढे चालवण्याचा प्रयत्न केला.