ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका आणि कार्यकर्त्या डॉ. विद्युत भागवत (वय ७६) यांचे गुरुवारी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगी, जावई आणि नातवंडं असा परिवार आहे. चाळीस वर्षांहून अधिक काळ भागवत यांनी महाराष्ट्रातील महिला, विद्यार्थी, दलित आणि शेतकऱ्यांच्या चळवळीत सक्रीय सहभाग नोंदवत त्यांच्या समस्यांवर विपुल लेखन केले.
पुणे विद्यापीठातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला अध्ययन केंद्राच्या संस्थापक संचालिका होत्या.
महिलांविषयक अभ्यासाला स्वतंत्र अभ्यास शाखा म्हणून घडविणाऱ्या विचारवंतांच्या यादीत भागवत यांचा समावेश होतो. स्त्रियांच्या प्रश्न, स्त्रीवादी सिद्धांत आणि सामाजिक इतिहासावर त्यांनी मराठी आणि इंग्रजीतून केलेले लिखाण अनेकांसाठी मार्गदर्शक ठरले. या लेखनातून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न समाजासमोर स्पष्टपणे मांडले. भाषाशास्त्र, साहित्य, समाजशास्त्र, शिक्षण आणि स्त्रीविषयक अभ्यास या विषयांवर त्यांनी विपुल संशोधनाबरोबरच अध्यापनही केले.
विविध भारतीय भाषांमधील लेखिकांचे साहित्य एकत्र आणणाऱ्या ‘विमेन्स रायटिंग इन इंडिया’ या प्रकल्पाच्या त्या संपादक होत्या. हा प्रकल्प भारतातील स्त्रीवादी अभ्यास प्रवासात महत्त्वाचा ठरला. हैदराबाद येथील ‘अन्वेषी’ या स्त्रीवादी संघटनेच्या कार्यालयात झालेल्या या प्रकल्पाचे सुसी थारू आणि के. ललिता यांनी नेतृत्व केले होते. शैक्षणिक लेखनाशिवाय त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये स्त्रीवादी चळवळींचा समग्र आढावा घेणारे, महिलांविषयक समाजातील ताज्या घडामोडींवर परखड मत मांडणारे लिखाण केले. त्यांचे कथा, कविता आणि कादंबरी लेखनही वाचकांना भावले. स्त्रीवादाचा मूळ स्त्रोत या दृष्टिकोनातून त्यांनी संत कवयित्रींच्या काव्यासंबंधीही अभ्यास केला. महिलांच्या चळवळींपासून ते दलित व गरीब शेतकर्यांच्या चळवळींपर्यंत त्यांनी लेखन केले.
‘स्त्री प्रश्नाची वाटचाल’, ‘स्त्रीवादी सामाजिक विचार’, ‘मी बाई आहे म्हणून’ ‘मानवशास्त्रातील लिंगभावाची शोधमोहीम’, ‘वाढत्या मूलत्त्ववादाला शहः सुसंवादी लोकशाहीच्या दिशेने’ ही पुस्तके त्यांनी लिहिली होती. याशिवाय त्यांचे अनेक शोधनिबंधही प्रसिद्ध झाले. ‘आरपारावलोकिता’ ही भागवत यांची पहिली कादंबरी हरिती प्रकाशनाने प्रकाशित केली होती.
लेखनाबरोबरच भागवत यांचा महाराष्ट्रातीलअनेक सामाजिक चळवळींत सक्रीय सहभाग होता. ऐतिहासिक, साहित्यिक आणि लिंगभेदाबाबत लिहिताना प्रदेश हा विभाग महत्त्वाचा असतो, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन विविध नामांकित संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरवले होते. त्यांच्या ‘स्त्री प्रश्नाची वाटचाल’ या पुस्तकाला समाजविज्ञान कोश पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र सारस्वत गौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.