विधान परिषदेच्या ११ जागांकरिता शुक्रवार १२ जुलै रोजी मतदान संपन्न होत असून त्याचनिमित्ताने शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत विधान भवन परिसरात आले होते. त्यांच्यासोबत यावेळी ठाकरे गटाचे तसेच काँग्रेसचेही आमदार होते. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. निवडणूक मतदान सुरू असतानाच त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय जाहीर केला.
मागे याच वास्तूमधून काही जण पळाले, आज कोण पळणार संध्याकाळी कळेल
मागील विधान परिषद निवडणुकीवेळी काहीजण याच विधान भवनातून पळून गेले. आजच्या निकालानंतर कोण कोण पळून कुठे जातात, हे तुम्हाला संध्याकाळी कळेल. कारण लोकसभा निवडणुकांत जनता आमच्यासोबत आहे, हे सगळ्यांनी पाहिले आहे. कोण जिंकेल कोण हरेल हे मी आत्ताच सांगणार नाही पण मविआचे तिन्ही उमेदवार यशस्वी होतील, असे भावित राऊत यांनी वर्तविले.
त्यांच्यासोबतचे आमचे वैचारिक भांडण
चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच्या भेटीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “आम्ही एकमेकांचे वैरी नाहीत. आम्ही राजकारणातले एकमेकांचे विरोधक आहेत. नरेंद्र मोदी-अमित शाह देखील संसदेत भेटतात, हात हातात घेतात. आमचे वैचारिक भांडण आहे. आज आहे तसे उद्याही त्यांच्यासोबत वैचारिक भांडण असेल”
भाजपमुळे राजकारणात कटुता आली
मला आज अनेक पक्षांचे नेते भेटले. विविध पक्षांचे आमदार भेटले. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. राजकारण बाजूला ठेवून व्यक्तिगत भेटीगाठी होत असतात. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षामुळे राजकारणात फार मोठी कटुता आली, असे संजय राऊत म्हणाले.
गणपत गायकवाड यांच्यासाठी वेगळा नियम कसा काय?
अनिल देशमुख तुरुंगात होते, त्यावेळी त्यांना मतदानाचा अधिकार नाकारला होता. नवाब मलिक यांनाही एकदा मतदान करू दिले गेले नव्हते. मग आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांना वेगळा नियम कसा काय? जर निवडणूक आयोग तटस्थ आणि निष्पक्ष असेल तर गायकवाड यांना मतदान करू देता कामा नये, असेही राऊत म्हणाले.