VIDEO | ये लडकी हाय अल्लाह… निसर्गात रमणारे तेजस ठाकरे अनंत-राधिका संगीत सोहळ्यात कसे?

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी याच्या लग्न समारंभाची चर्चा कित्येक महिन्यांपासून रंगलेली आहे. दोन महिने आधी झालेल्या प्री-व्हेडिंगपासून ते पार आता हळद, संगीत, मेहंदी अशा विविध सोहळ्यांचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. संगीत सोहळ्यात तर बॉलिवूड तारांगणापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकारही सहभागी झाले आहेत.

नुकताच अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यातील एक व्हिडिओ समोर आला. त्यात सोशल मीडिया सेन्सेशन ऑरी स्टेजच्या मधोमध नाचत होता, मात्र मागच्या रांगेत नाचणारा एक गोरापान आणि उंचपुरा तरुण लक्ष वेधून घेत होता. हा २९ वर्षीय युवक दुसरा-तिसरा कोणी नसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू, अर्थात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे आहेत.

ठाकरे-अंबानी कौटुंबिक संबंध

बीकेसी येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये अनंत-राधिकाचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्याला उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. रश्मी ठाकरे यांच्या एलिगंट साड्या, आदित्य ठाकरे यांचा लक्षवेधी लूक पाहत असतानाच तेजस ठाकरे यांच्यावरही या सोहळ्यात अनेकांच्या नजरा खिळल्या. अनेक जणांना प्रश्न पडला, की तेजस ठाकरे हे अंबानींच्या संगीत सोहळ्यात कसे काय? अनेकांनी त्यावरुन टीकाही केली. मात्र उद्धव ठाकरे आणि मुकेश अंबानी कुटुंबाचे स्नेहाचे संबंध आहेत. त्यामुळेच पुढच्या पिढ्यांतही घट्ट मैत्री झालेली आहे.

ऑरी, सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांड्ये, शिखर पहाडिया, वीर पहाडिया या बॉलिवूडमधील स्टार किड्ससोबतच तेजस ठाकरे ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘ये लड़की हाए अल्लाह हाए-हाए रे अल्लाह’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

कोण आहेत तेजस ठाकरे?

राजकारणापासून दूर राहिलेले उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सभांच्या व्यासपीठावर दिसले होते. आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी तेजस मैदानात उतरले होते. त्यानंतर त्यांचं जाहीर दर्शन घडलं ते शिवसेना फुटीनंतर झालेल्या ठाकरेंच्या सभांस्थळी.
MLC Elections : ठाकरे गटाची काँग्रेससोबत बैठक, नार्वेकरांसाठी मतांची जुळवाजुळव, भाजपही सावध
निसर्ग संवर्धनाच्या माध्यमातून समाजाला योगदान देत असल्याचं ते वारंवार सांगतात. घरात राजकीय वातावरण आहे, पण राजकारणात येण्याचा तूर्तास काही प्लॅन नाही, असं तेजस ठाकरेंनी सांगितलं होतं.

ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनची स्थापना

फेब्रुवारी २०१६ मध्ये तेजस ठाकरे यांनी गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या पाच नवीन प्रजाती शोधून काढल्या होत्या, त्यापैकी एकाला त्यांच्या आडनावावरून ‘गुबरनेटोरियाना ठाकरी’ असं नाव देण्यात आलं होतं. नुकताच तेजस ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरड्याच्या आणखी एका नवीन प्रजातीचा शोध लावला होता. ‘जपलुरा मिक्टोफोला’ असे या प्रजातीचे नामकरण करण्यात आले असून ती अरुणाचल प्रदेशात आढळते.

सरडे-खेकड्यांच्या प्रजातींना माझं नाव देण्याचा उद्देश नाही, पण सह्याद्रीच्या रांगांकडे किती लक्ष वेधलं जातं आणि संरक्षण मिळतं, यात तेजस ठाकरे समाधान मानतात. आरे वाचवा मोहिमेतही ते हिरीरीने सहभागी झाले होते. २०२१ मध्ये काही समवयस्क सदस्यांसह तेजस यांनी ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनची स्थापना केली आहे.