Video : घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग पडलं, अनेकजण खाली दबले गेल्याची भीती

मुंबई : मुंबईसह उपनरात आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारपासून मुंबई आणि मुंबई उपनगरात ढगाळ वातावरण झालं होतं. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे होर्डिंग कोसळलं. होर्डिंगखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमध्ये ७ जण जखमी झाले आहेत. जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी धाव घेतली आहे. सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.

हे होर्डिंग लोहमार्ग पोलीस वसाहतीच्या हद्दीत असून महाराष्ट्र राज्य पोलीस वेलफेअर अससोसिएशनच्या नावे जागा आहे. त्या होर्डिंगला लायसन्स नसून मुंबई महापालिकेने नोटीस बजावून ऑब्जेक्शन घेतलं होतं. तसंच होर्डिंग दिसावं म्हणून याच हद्दीतील झाडावर विषप्रयोग केल्याने मुंबई महापालिकेने एफआयआरही केल्याचं स्पष्ट केलं आहे. अनधिकृतपणे होर्डिंग लावल्याचाही आरोप मुंबई महापालिकेने केला आहे. घाटकोपरमधील घटनास्थळी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशीही दाखल होत आहेत.

मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागात जाऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्याशिवाय होर्डिंग पडलं त्याखाली ८० गाड्या दबल्या गेल्याची माहिती समजते आहे, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.