भाजी खारट झाली ? नो प्रॉब्लेम,’हा’ सोपा जुगाड वाचवू शकतो तुमचा स्वयंपाक

भाजी खारट झाल्यास काय करावे ? Image Credit source: social media

स्वयंपाक करताना कधी कधी हातून थोडंसं मीठ जास्त पडतं आणि सगळ्या मेहनतीवर पाणी फिरतं! मग काय — तयार भाजी, आमटी किंवा डाळ एकदम खारट लागते आणि खाण्याची मजा खराब होते.

पण काळजी करू नका! अशी चव बिघडली तरी पदार्थ वाचवायचे काही भन्नाट आणि अगदी सोपे जुगाड तुमच्या किचनमध्येच लपलेले असतात. चला, जाणून घेऊया हे खास उपाय !

1. कच्चा बटाटा : भाजी, आमटी किंवा डाळ खारट झाली तर लगेचच एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घ्या, त्याची साले काढा आणि मोठे तुकडे करा. हे तुकडे त्या खारट पदार्थात टाका आणि ५-१० मिनिटं मंद आचेवर शिजवा. बटाट्यात नैसर्गिक स्टार्च असतो जो अतिरिक्त मीठ शोषतो. शिजल्यानंतर बटाट्याचे तुकडे काढून टाका आणि मग पहा, चव एकदम बॅलन्स झालेली वाटेल!

2. गव्हाच्या पिठाचा गोळा : बटाटा नसेल तर गव्हाचं पीठ वापरता येतं. एक छोटासा घट्ट गोळा मळा (त्यात मीठ नसावं). खारट झालेल्या भाजीत किंवा आमटीत तो गोळा टाका आणि थोडा वेळ मंद आचेवर शिजू द्या. गोळा मीठ शोषून घेतो आणि नंतर तो बाहेर काढला की पदार्थ खाण्यायोग्य होतो.

3. दूध किंवा क्रीम : भाजी किंवा ग्रेव्ही खारट लागली तर थोडंसं दूध किंवा क्रीम घालणं हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे भाजीचा Texture मस्त स्मूथ होतो आणि मिठाचा खारटपणा कमी जाणवतो.

4. थोडी आंबट चव आणा : कधी कधी पदार्थ खारट झाल्यावर त्यात थोडा आंबटपणा आणल्यास चव एकदम बॅलन्स होते. त्यासाठी लिंबाचा रस, टोमॅटो प्युरी किंवा आमचूर पावडर घालता येते.

5. तांदळाची पेज : जर सूप किंवा पातळ आमटी खारट झाली असेल, तर त्यात थोडं शिजवलेल्या भाताचं पाणी (पेज) घाला आणि पुन्हा उकळवा. यात असणारा स्टार्च मिठाचं प्रमाण कमी करतो आणि चव बऱ्याच प्रमाणात सुधारते.

पदार्थ जास्त खारट झाल्यावर लगेच फेकून देण्याचा विचार न करता, हे छोटे उपाय वापरून बघा. किचनमधले हे सोपे ट्रिक्स तुमचा स्वयंपाक वाचवू शकतात आणि चव पुन्हा उत्तम बनवू शकतात!

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)