2024 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेकडून खासदारकीचे तिकीट मिळावं अशी वसंत मोरे यांची अपेक्षा होती. परंतु तसं झालं नाही. म्हणून त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मिळवत निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. अशातच आता वसंत मोरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. वसंत मोरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे पुण्यातील राजकारणात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. विशेषत: ठाकरे गटाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
जी जबाबदारी मिळेल ती पार पडेल
वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेत कोणती जबाबदारी देण्यात आली? असा प्रश्न विचारण्यात आला यावर उत्तर देताना वसंत मोरे म्हणाले की, ” मला अद्याप कुठलाही शब्द देण्यात आला नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रवेश करत आहे. त्यामुळे पक्ष जी जबाबदारी मला देईल ती स्वीकारून प्रामाणिकपणे काम करेन”.
वसंत मोरे विधानसभा निवडणूक लढवणार ?
2024 च्या लोकसभेमध्ये दारुण पराभव झाल्यामुळे वसंत मोरे हे विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. त्याच अनुषंगाने वसंत मोरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी अवघ्या दोन ते तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपआपल्या मतदारसंघातील घडामोडींचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे.