Vasant More : वसंत मोरेंच्या हाती शिवबंधन, पक्षप्रवेशावेळीच उद्धव ठाकरेंकडून तात्यांना शिक्षा

मुंबई : पुण्याचे वसंत मोरे राज ठाकरेंच्या मनसेतून वंचित बहुजन आघाडीमध्ये गेले. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यात त्यांनी पक्षाला रामराम करत आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी वसंत मोरेंचं ठाकरेंच्या शिवेसेत जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना शिवसैनिक असून शिवसेना सोडल्यानंतर शिक्षा दिली. नेमकी कोणती शिक्षा दिली?

उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना काय शिक्षा दिली?

वसंत मोरे आणि त्यांच्यासोबत जवळपास १६ जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. आपल्या स्वगृही परतलेल्या सर्व शिवसैनिकांचे स्वागत करतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी वसंत तात्यांचं स्वागत केलं. शिवसेनेच्या बाहेर पक्षात कोणाला काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो याचा अनुभव घेऊन, अधिक परिपक्व होऊन तुम्ही स्वगृही परतला आहात. आज तुमचं महत्त्व, तुमची जबाबदारी, काम मोठं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेना सोडल्याबद्दल आता तुम्हाला शिक्षा तरी झाली पाहिजे असं म्हटलं.

पुण्यात कित्येत पटींनी शिवसेना वाढवून पाहिजे, अशी शिक्षा उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना दिली. शिक्षा शब्दाचा अर्थ जबाबदारी या अर्थाने घ्या असंही ते यावेळी म्हणाले.
Vasant More In Shivsena : ‘मनसे’ पाठोपाठ ‘वंचित’ला ठोकला राम राम, वसंत मोरेंच्या हाती आता ठाकरेंची ‘मशाल’

‘खूप पाऊस झाला आणि वसंतही फुलला’

दरम्यान, संजय राऊत यांनी वसंत मोरे यांच्या शिवसेना प्रवेशाबद्दल बोलताना, खूप दिवसांनी खूप पाऊस झाला आणि वसंतही फुलला असं म्हणत वसंत मोरेंचं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत स्वागत केलं. संजय राऊत यांच्या या विधानानंतर वसंत मोरे आगे बढो हम तुम्हारे साथ हैच्या घोषणा सुरू झाल्या. त्यावेळी बोलताना संजय राऊत यांनी आता त्यांना आगे बढो नको, आहेत तिथेच थांबू द्या, असं म्हणत एकच हशा पिकला.

‘ते खूप पुढे आले आहेत आणि मातोश्रीपर्यंत पोहोचले आहेत. वसंत तात्यांचं स्वागत करतो. तात्या लोकसभा लढले. आता पुढे ते काय करणार अशी चर्चा होती. पण तात्या पुढे मातोश्रीचं गाठणार अशी खात्री असल्याचं’. संजय राऊत म्हणाले.

कारण तात्यांची सुरुवात शिवसेनेतून झाली होती. ते कुठेही गेले असले तरी ते मुळचे शिवसैनिक आहेत. आणि शेवटी ते शिवसेनेत आले आहेत. तात्या शिवसेनेत आल्याने खडकवासला, पुणे आसपासच्या परिसरातील शिवसेनेची ताकद वाढणार आहे, उद्धव ठाकरेंना मजबूत, चांगला कार्यकर्ता, शिवसैनिक मिळाला असल्याचंही राऊत म्हणाले.