राजेंद्र हगवणे सीसीटीव्ही कैद झालेImage Credit source: TV 9 Marathi
Vaishnavi Hagawane Death Case Updates: पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणात फरार असलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अखेर अटक झाली आहे. या प्रकरणात वैष्णवीचा पती शंशाक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना यापूर्वीच अटक झाली होती. वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी मुलीच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानंतर १७ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता.
असा रचला सापळा
वैष्णवी हिचे लव्ह मॅरेज होते. घरच्या मंडळीचा विरोध असताना तिच्या हट्टामुळे शंशाकसोबत लग्न लावून दिले. लग्नात ५१ तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी आणि इतर अनेक गृहउपयोगी वस्तू दिल्या होत्या. त्यानंतरही तिचा हुंड्यासाठी छळ होत होता, असे वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी म्हटले. या प्रकरणात १७ मे रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघांना अटक झाली होती. परंतु सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते. गुरुवारी मावळ तालुक्यातील तळेगाव येथे एका हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये ते दिसले. राजेंद्र हगवणे मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करत होते. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या रस्त्यावरुन सुशील निघून गेला. पोलिसांना ही माहिती समजाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली. संपूर्ण परिसरात झडती घेतली. अखेर शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी वाढवली होती पथके
पोलिसांनी दोन दिवसांत वेगाने तपास सुरु केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी बारामती येथील सभेतच राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक होईल, असे सांगितले होते. त्यासाठी पोलिसांची पथके वाढवल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते.
दरम्यान, वैष्णवीचे काका मोहन कस्पटे यांनी दोघांना अटक केल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले आहे. उशीर झाला, पण आता आमच्या मुलीस न्याय मिळावा. या लोकांना मोक्का लावून, फाशी दिली पाहिजे, अशी मागणी मोहन कस्पटे यांनी केली आहे. हगवणे कुटुंबातील मोठी सुन मयुरी हिनेही गुरुवारी तिचा छळ झाल्याची माहिती दिली होती.