पुण्यात 16 मे रोजी एक धक्कादायक घटना घडली होती, वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली, सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली असा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती, दीर, सासू, सासरा आणि नणंद यांना अटक केली आहे. या प्रकरणात दररोज नवनवी खुलासे होत आहेत.
या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे या प्रकरणात वैष्णवीचे दोन भाऊ विराज व पृथ्वीराज आणि तिची एक मैत्रीण अशा तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तसेच वैष्णवीला देण्यात आलेलं स्त्रीधन देखील जप्त करण्यात आलं आहे. यामध्ये चांदीची भांडी ज्यामध्ये (पाच ताटं ,पाच तांबे ,चार वाट्या, एक करंडा, एक अधिक महिन्यात दिलेलं चांदीचं ताट ) जप्त करण्यात आलेलं आहे.
दरम्यान या प्रकरणात आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. दमानिया यांनी आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप केले आहे. जालिंदर सुपेकर आणि हगवणे कुटुंब यांचे जवळचे संबंध आहेत, हगवणे कुटुंबीयांनी आपल्या सूनांना सुपेकर यांचा धाक दाखवला, या विरोधात मयुरीच्या आईने महिला आयोगाला पत्र देखील लिहिलं होतं. निलेश चव्हाण याला बंदुकीचं लायसन्स देखील जालिंदर सुपेकर यांनीच दिलं. जालिंदर सुपेकर यांनी कारागृहात जी खरेदी केली त्याच्यामध्येही 500 कोटी रुपयांचा घोटाळा आहे. नाशिक कोल्हापूर असे सर्व कारागृह त्यांच्याकडे आहेत, असा गंभीर आरोप या प्रकरणात अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
दरम्यान या प्रकरणात आरोपी असलेला वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे याच्याबाबत देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवीने आत्महत्या केल्याच्या दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह पाहाण्यासाठी राजेंद्र हगवणे आपल्या 20 ते 25 कार्यकर्त्यांसह रुग्णालयात गेले होता, मात्र तिथेच त्याला गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागली आणि तो फरार झाला, अशी माहिती समोर येत आहे.