पुण्यातील प्रशिक्षण काळात पूजा खेडकर यांनी केलेले गैरवर्तन, बनावट अपंगत्व आणि ओबीसी (नॉन क्रिमीलेयर) प्रमाणपत्रांचा वापर अशा कारणामुळे त्यांचा पाय अधिक खोलात गेला. याची दखल घेऊन त्यांच्या प्रशिक्षण कालावधीला राज्य सरकारने मंगळवारी स्थगिती दिली. पूजा खेडकर यांना मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण संस्थेत त्वरित हजर होण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर यूपीएससीने परिपत्रक जारी करून पूजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंबंधी पावले उलचत असल्याचे सांगितले आहे.
पोस्ट रद्द का करू नये याबद्दल कारणे दाखवा नोटीस
संघ लोकसेवा आयोगाने प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावरील आरोपांची चौकशी केली असून त्यांनी यूपीएससी परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात येत आहे. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यांची निवड का रद्द करू नये? असे प्रश्न विचारत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
अपंगत्वाच्या खोट्या प्रमाणपत्राचा परिपत्रकात मुद्दा नाही
दुसरीकडे अपंगत्वाच्या खोट्या प्रमाणपत्राबद्दलचा तसेच नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राबद्दलचा मुद्दा यूपीएससीच्या परिपत्रकात नसल्याने लोकांमधून तसेत प्रशासकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याऐवजी फक्त नाव बदलून परीक्षा दिल्याचा उल्लेख करून त्या पार्श्वभूमीवरच गुन्हा करणार असल्याचे यूपीएससीने परिपत्रकात म्हटले आहे.
पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘वाढीव’ प्रकारांची माहिती देणारा रिपोर्ट राज्य सरकारला सादर
राज्य सरकारने पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणासाठी नियुक्ती केली होती. प्रशिक्षणापूर्वीच वाहन व्यवस्थेची, वेगळ्या दालनाची आणि इतर सोयीसुविधांची मागणी करणे, तसेच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरचा ताबा घेऊन तिथे कार्यालय थाटणे, त्यांच्या खासगी मालकीच्या ऑडी गाडीवर अंबर दिवा लावणे यामुळे खेडकर वादग्रस्त ठरल्या. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी खेडकर यांच्या प्रशिक्षण काळातील ‘वाढीव’ प्रकारांची माहिती देणारा रिपोर्ट सरकारला सादर केला आहे.