…तोपर्यंत शिंदेंना मंत्रिमंडळात घेऊच नका; आदित्य ठाकरेंची फडणवीसांकडे मोठी मागणी

आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजप  आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईतील रस्ता घोटाळ्याची एसआयटी चौकशी लावा अशी मागणी मुंबई भाजपाकडून होत आहे, यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

मुंबई भाजपकडून मुंबई रस्ता घोटाळाप्रकरणात एसआयटी चौकशी लावण्याची मागणी होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईतील रस्त्याच्या घोटाळ्याची चौकशी करा हेच मी बोलत होतो. जी मी मागणी करत होतो, तीच मागणी आता भाजप करत आहे. खोके सरकारच्या देखरेखीत मोठा घोटाळा झाला आहे. आता फडणवीसांचं सरकार आलं आहे, त्यांना आता स्वच्छ सरकार चालवण्याची खरोखर मोठी संधी आहे, त्यांना जर स्वच्छ सरकार चालवायचं असेल तर त्यांनी चौकशी पूर्ण होईलपर्यंत एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात घेऊ नये, अशी मागणी यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की या सर्वामध्ये त्यांचा हात नाही, आणि ठेकेदाराचा फायदा झाला नाही. तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळापासून बाजुला ठेवावे तर आणि तरच आम्ही समजू की हे सरकार वाशिंग मशिन सरकार नाही.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून देखील भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचं हिंदुत्व हे फक्त निवडणुकीपुरतं आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपचं निवडणुकीपुरत हिंदुत्व समोर आणलं आहे. भाजप शासित राज्यातच हिंदुत्व धोक्यात आहे.  दादरमधील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या मारूतीच्या मंदिराला नोटीस देण्यात आली, त्यांच्याच सरकारने दिलेल्या नोटीशीच्या विरोधात त्यांच्याच लोकांनी आंदोलन केलं आणि घाई गरबडीमध्ये या नोटीशीला स्थगिती दिली असंही यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)