मोठी बातमी! ‘जोपर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी..’, सुरेश धसांनी घेतला मोठा निर्णय

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेनंतर आता राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे, राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होताना दिसत आहेत. या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी शनिवारी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची तसेच ग्रामस्थांची भेट घेतली. या भेटीनंतर आता त्यांनी आज मोठी घोषणा केली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळत नाही, तोपर्यंत स्वागत सत्कार स्वीकारणार नाही, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे. धाराशिवमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये त्यांनी सत्कार नाकारला आहे. मंत्री जयकुमार गोरे यांची धाराशिवचे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली, तसेच भाजप नेते सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.  भाजप आमदार सुरेश धस या कार्यक्रमाला उपस्थित होते, मात्र त्यांनी सत्कार नाकारला आहे. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण सत्कार स्विकारणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

सुरेश धस यांची परळीला भेट  

दरम्यान शनिवारी सुरेश धस हे परळी दौऱ्यावर होते. त्यापूर्वी त्यांनी मस्साजोगमध्ये जाऊन पुन्हा एकदा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची आणि तेथील ग्रामस्थांची भेट घेतली. ग्रामस्थांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा देखील त्यांनी केला. परळी दौऱ्यात मात्र त्यांना विरोध झाल्याचं पाहायला मिळालं. सुरेश धस हे परळीचं नाव बदनाम करत असल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं, जोरदार घोषणाबाजी करत त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले.

धस-मुंडे भेटीची चर्चा 

सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती, ही भेट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपण मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचं स्पष्टीकरण या भेटीवर सुरेश धस यांनी दिलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)