लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. महायुतीला मोठा धक्का बसला अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनगरागमन केलं. राज्यात महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीमधील प्रमुख तीन पक्ष भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना मिळून तब्बल 232 जागा जिंकल्या. दुसरीकडे महाविकास आघाडीला असा तसा फक्त 50 जागांचाच आकडा गाठता आला. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं चित्र आहे.
याचा सर्वात जास्त फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसत असल्याचं दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला लागलेली गळती अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. आज पुन्हा एकदा एक मोठा धक्का ठाकरे गटाला बसला आहे. शिवसेना ठाकरे गटातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते जितेंद्र जनावळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते शिवसेना ठाकरे गटाचे विलेपार्लेचे उपविभाग प्रमुख होते. जनावळे हे येत्या वीस तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
विलेपार्लेचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. येत्या काही दिवसांमध्ये महापालिकेच्या निवडणुका लागू शकतात असे संकेत मिळत आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जनावळे यांनी राजीनाम्यापूर्वी उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक भावनिक पत्र लिहीलं आहे, साहेब मला माफ करा असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के सुरूच आहेत. पुण्यामधील काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नेते राजन साळवी यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.