परदेशात…मनसे-ठाकरे गटाच्या एकत्रिकरणावर उद्धव ठाकरेंच्या बड्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले..

Vinayak Raut : गेल्या अनेक दिवसांपासून मनसेचे आणि ठाकरे गट यांच्या युतीची चर्चा चालू आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे केलेल्या विधानांनंतर या युतीच्या चर्चेला चांगलीच हवा मिळाली. दरम्यान, दोन्ही बाजूच्या नेत्यांनी नंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. असे असतानाच ठाकरे यांच्या शिवसेनेतील बडे नेते विनायक राऊत यांनी याच ठाकरे बंधूंच्या एकत्रिकरणावर मोठी आणि महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.

विनायक राऊत नेमकं काय म्हणाले?

“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे परदेशात गेले हा योगायोग आहे. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे हे मुंबईत परत आले आहे. महाराष्ट्रातील सर्वच जनतेची एक इच्छा आहे. सध्याची वाईट राजवट, महाराष्ट्र लुबाडू पाहणाऱ्यांची राजवट उलथवून टाकायची असेल तर ठाकरे बंधुंनी एकत्र यावं, अशी जनतेची इच्छा आहे. हे नाकारता येत नाही, असं विधान ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केले.

अजित पवार यांना खुली ऑफर

विनायक राऊत यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील महाविकास आघाडीत येण्याची खुली ऑफर दिली. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हायचं आहे. पण अद्याप योग आला नाही, असं विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. हाच धागा पकडून विनायक राऊत यांनी अजित पवार जोपर्यंत महायुतीत आहेत, तोपर्यंत ते मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीत यावं, अशी खुली ऑपरच विनायक राऊत यांनी दिली आहे.

अद्याप कोणत्याही हालचाली नाही

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सगळीकडे रंगली आहे. दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत अनुकूलता दाखवली आहे. त्यानंतर मात्र अद्याप कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आपापल्या परदेश दौऱ्याहून परतले आहेत. त्यामुळे आता पडद्यामागे नेमक्या काही घडामोडी घडणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)