सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. राज्याच्या विविध भागात नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहेत. हे वाढत चाललेलं डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरे गट आता सक्रीय झाला आहे. ठाकरे गटाचे नेते आता सावध भूमिकेत आहेत. ठाकरेंच्या सर्व नेत्यांची शिवसेना भवनात प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आढावा बैठक होईल. पक्षातील डॅमेज कंट्रोलसाठी ही ठाकरे सेनेची रणनिती आहे. पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार आहेत.
डॅमेज कंट्रोलच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते राज्यभर विविध ठिकाणी दौरे करणार आहेत. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं म्हणणं जाणून घेणार आहेत. राज्यातील नाराज पदाधिकाऱ्यांची बाजू नेते जाणून घेणार आहेत. संघटनेत विश्वास संपादन करून एकमेकांमध्ये समन्वय राखत संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेना पक्षात येत्या काळात संघटनात्मक बदल सुद्धा अपेक्षित असल्याची सूत्रांची माहिती आहे.
सध्याची ठाकरे गटाची रचना कशी आहे?
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोलसाठी पक्षातील प्रत्येक नेता, उपनेते, सचिव त्यांना दिलेल्या विशिष्ट जबाबदारीनुसार काम करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. मागील काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील काहीजण पक्षविरोधी काम करत असल्याच निदर्शनास येत आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या आदित्य ठाकरे आणि इतर 14 जणांवर नेते पदाची, 43 जणांवर उपनेते पदाची आणि दहा जणांवर सचिव पदाची जबाबदारी आहे.
हे 14 नेते दर आठवड्याला भेटणार
ठाकरेंच्या शिवसेनेमधील 14 महत्त्वाच्या नेत्यांची दर आठवड्याला बैठक होणार आहे. यामध्ये सुभाष देसाई, दिवाकर रावते, आदित्य ठाकरे, अनंत गीते,संजय राऊत, चंद्रकांत खैरे, भास्कर जाधव,विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब,अरविंद सावंत, अंबादास दानवे, राजन विचारे, सुनील प्रभू यांचा समावेश आहे. ठाकरे गटातून बाहेर पडल्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना-भाजपा यापैकी एका पक्षाची निवड करत आहेत.