उद्धव ठाकरे-नरेंद्र मोदी (फाईल फोटो) Image Credit source: TV 9 Marathi
शिवसेनेत बंडखोरीनंतर दोन्ही गटाकडून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. खरी शिवसेना कोणाची? याबाबत दोन्ही गट आपलाच दावा करत आहे. परंतु आता शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. भाजपवर नेहमी आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर लोटांगण घातले होते, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.
तपास यंत्रणांच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर लोटांगण घातले, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केला. दिल्लीत जाऊन मला वाचवा, राज्यात युती सरकार स्थापन करु, असे सांगून आलेल्या ठाकरे यांनी राज्यात आल्यावर पलटी मारली, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठावर केला.
संभाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही…
राज्य सरकारच्या वतीने आज उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विधान परिषदेत निवेदन सादर केले. ते पुढे म्हणाले की, सत्तेसाठी उबाठा शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सोडले आणि औरंगजेबी विचार स्वीकारले आणि काँग्रेससोबत गेले. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवले त्यांच्याबरोबर तुम्ही सत्तेसाठी गेलात, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. काँग्रेसकडे गहाण टाकलेला धनुष्यबाण आणि शिवसेनेला आम्ही अडीच वर्षांपूर्वी धाडस करुन सोडवले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. औरंगजेबाचे विचार स्वीकारल्याने तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना उबाठा गटाला यावेळी सुनावले.
महाविकास आघाडीकडून षडयंत्र
आपण कधी सत्तेचा आणि खुर्चीचा कधीच मोह केला नाही. खुर्चीपाठी बसलेल्या माणसांच्या अडचणी सोडवण्याला कायम प्राधान्य दिले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महाविकास आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांना जेलमध्ये टाकण्याचे षडयंत्र केले होते. मात्र आम्ही मंत्रीपदावर लाथ मारली, उठाव करुन महाविकास आघाडी सरकारचा टांगा पलटी केला आणि महायुतीचे सरकार आणले, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात सांगितले.