लोकसभेत काल केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक मांडलं. बहुमताच्या बळावर भाजप प्रणीत NDA ने हे विधेयक मंजूर करुन घेतलं. आज हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. वक्फ सुधारणा विधेयकावरुन सत्ताधारी भाजपने उद्धव ठाकरे गटाला हिंदुत्वाच्या मुद्यावरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या विधेयकावर उद्धव ठाकरे गटाची भूमिका काय असणार? याची उत्सुक्ता होती. आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या टॅरिफ घोषणेसह, वक्फ सुधारणा विधेयकावर आपली भूमिका मांडली. “नुकतीच ईद झाली आहे. ईदवेळी या सर्वांनी ईदच्या मेजवान्या झोडल्या. आता ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आहे. योगायोग आहे किरेन रिजिजू यांनी हे बिल मांडलं. रिजिजू यांनीच गोमांस खाण्याचं एकेकाळी समर्थन केलं होतं. त्यांनीच हे बिल मांडलं आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे. भाजप काय करते हेच कळत नाही. कधी सांगणार औरंगजेबाची कबर खोदणार, आणि त्यांची लोकं कुदळ फावडं घेऊन जातात, आणि मग म्हणतात अरे परत माती टाका. तसेच यांची लोकं म्हणतात मशिदीत जाऊन मारू. मग मारायला जातात त्यांना सांगतात हत्यार बाजूला ठेवा आणि सौगात ए मोदी घेऊन जा. लोकांना झुंजवायचं आणि आपल्या पोळ्या भाजायच्या भाजपने केलं आहे” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
काश्मिर पंडितांना त्यांच्या घरी का जाता येत नाही?
“चर्चा बघत होतो. वक्फ बोर्डातील काही सुधारणा चांगल्या आहेत. पण यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे. गरीब मुस्लिमांबाबत यांच काय धोरण आहे. ३७० कलमाला आम्ही पाठिंबा दिलो होता. काश्मीरमधील अनेक निर्वासित इकडे तिकडे फिरत होते. त्यांना शिवसेना प्रमुखांनी आसरा दिला. ३७० कलम हटवलं. किती काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन झालं. त्यांना किती त्यांच्या जमिनी दिल्या. काश्मिर पंडितांना त्यांच्या घरी का जाता येत नाही, यावर त्यांनी उत्तर द्यावं” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
बाळासाहेबांनी मुस्लिमांना इज्तेमा करण्याची परवानगी दिली होती
“यांचा जमिनीवर डोळा आहे. देशातील इतिहासात मुस्लिमांचा कळवळा घेणारी भाषण भाजपने केली. अमित शाहपासून सर्वांनी केली. जिनांनाही लाजवेल अशी ही भाषणं होती. हे मुस्लिमांच्या बाजूने आहेत की नाही. मग हिंदुत्वाचं काय झालं? हिंदूत्व सोडलं का? बाळासाहेबांनी मुस्लिमांना इज्तेमा करण्याची परवानगी दिली होती. तीच जागा व्यापाऱ्यांसाठी उद्योगपतीच्या खिशात घातली. किरेन रिजिजूपासून सर्व खाली मान घालून बघत होते. हे काय चाललंय. मुस्लिमांच्या हिताचं हे बिल आहे का? असेल तर मग हिंदुत्व तुम्ही सोडलं की आम्ही सोडलंय?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.