ठाकरे कुटंबातील कलहावर अखेर पडदा? उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्याकडून भांडणे…

Raj Thackeray And Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. हीच निवडणूक समोर ठेवून राज्यातील राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. युती आणि आघाड्यांचे समीकरण जुळवण्यास सुरुवात झाली आहे. असे असतानाच आता ठाकरे कुटुंबाीतील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बडे नेते एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकमेकांवर सडकून टीका करताना दिसलेले आहेत. हे दोघेही एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. ठाकरे कुटुंबातून आलेले असले तरी त्यांच्यातील राजकीय वाद अजूनही कायम आहे. असे असतानात आता राज ठाकरेंनी घातलेल्या सादेला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिल्यामुळे ठाकरे कुटुंबातील कहलावर पडदा पडणार का असे विचारले जात आहे. माझ्याकडून कधी भांडणं नव्हतीच असं, असं म्हणून राज ठाकरेंसोबत युतीची दारं खुली असल्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आमच्यातली भांडणं फार छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे, असं म्हटल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिलीय. मी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी मी एकत्र यायला तयार आह, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तसेच राज ठाकरेंसोबत युती करण्याची अप्रत्यक्ष तयारी दाखवल्यानंतर त्यांनी एक अटही समोर ठेवलीय. माझ्याकडून कुणाशी भांडण नव्हतंच. पण एकत्र येण्यासाठी महाराष्ट्राचं हीत ही एकच शर्त आहे. चोरांच्या गाठीभेटी घ्यायच्या नाही. त्यांचा प्रचार करायचा नाही. अगोदर ही शपथ घ्याची आणि मग टाळी देण्याची हाळी द्यायची, अशा अटी उद्धव ठाकरे यांनी ठेवली आहे.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

राज ठाकरे यांनी नुकतेच प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली. मांजरेकर यांच्या यूट्यूब चॅनेलवर ही मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे. याच मुलाखतीत मांजरेकर यांनी अजूही तुम्ही (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) एकत्र येऊ शकता का? असा सवाल केला होता. या प्रश्नांचे उत्तर देताना राज ठाकरेंनी फारच सूचक आणि मोठा अर्थ निघणारं उत्तर दिलंय. “कुठल्याही मोठ्या गोष्टी, आमच्यातले वाद, आमची भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्त्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी ही भांडणं, वाद अत्यंत क्षुल्लक गोष्टी आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं या फार कठीण गोष्टी आहेत, असं मला वाटत नाही,” असं सकारात्मक मत राज ठाकरेंनी मांडलंय.

तसेच, “माझ्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा विषय नाही. लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे. मी ते पाहतो आहे,” असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. त्यानंतर आता राज ठाकरेंच्या या विधानानंतर राजठाकरेंचा मनसे पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षात युती होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)