शिवसेना प्रमुखांनी आत्मचरित्र का लिहिले नाही…उद्धव ठाकरे यांनी दिले उत्तर

Shivsena Pramukh Balasaheb Thackeray Smarak: शिवसेना प्रमुखांबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते. परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे आत्मचरित्र कधी लिहिले नाही. बाळासाहेबांनी स्वत: सांगितले होते की, मी कधीही निवडणूक लढवणार नाही आणि मी आत्मचरित्र लिहिणार नाही. मग शिवसेना प्रमुखांनी आत्मचरित्र का लिहिले नाही? आजच्या युवकांना पडत असतो. त्याचे उत्तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिली.

आत्मचरित्र का लिहिले नाही?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, चार भिंती म्हणजे स्मारक नाही. शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट म्हणजे हे स्मारक आहे. त्यापासून सर्वांना प्रेरणा मिळावी, हीच आमची अपेक्षा आहे. शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर महाराष्ट्राला दिले तेच काम या स्मारकाने दिले पाहिजे. शिवसेना प्रमुखांनी आत्मचरित्र कधी लिहिले नाही. त्यावर त्यांना विचारले जात होते. ते म्हणत होते, मी कपाटातील माणूस नाही. मी मैदानावरचा माणूस आहे. त्यांचे आयुष्य उघडे पुस्तक होते.

आता टप्पा दोनचे काम…

23 जानेवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी आम्ही हे स्मारक शिवसेनाप्रमुखांवर श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी अर्पण करणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पहिल्या टप्पाचे काम पूर्ण झाले. पण ते काम सोपे नव्हते. अनेक अडचणी होत्या. आता टप्पा दोनचे काम सुरू होणार आहे. आराखडा तयार झाला आहे.

शिवसेनाप्रमुखांची आठवण सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांनी पर्यावरणावर प्रेम केले. झाडांवर प्रेम केले. त्यामुळे त्यांचे स्मारक उभारताना एकही झाड तोडू नये, असे मी सांगितले होते. तसेच महापौर बंगला पुरातत्व वास्तू आहे. त्यामुळे बंगल्याच्या परिसरात नवे बांधकामही कराता येणार नव्हते. त्यामुळेच आम्ही भूमिगत स्मारक तयार केले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)