यावेळी आपले मत मांडताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘भाजपाचा अजिंक्यपणा किती फोलपण आहे हे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलं आहे. संविधान वाचवण्यासाठी ही लढाई होती. देशाने आमच्या आघाडीला जो कौल दिला आहे. यातून स्पष्ट होते की, देशाला आता जाग आली आहे.’
फेक नॅरेटिव्ह वर ठाकरे ‘सडेतोड’
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या फेक नॅरेटिव्हच्या टीकेवर सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, ‘विरोधकांना मतं दिली तर तुमची संपत्ती जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील, मंगळसूत्र उचलून नेतील, नळ कापून नेतील, तुमची म्हैस उचलून नेतील, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं का? उद्योगधंदे वाढवेन आणि प्रत्येकाला नोकरी देईन, घर देईन हे पण खरं होतं का? २०१४ पासून भाजपने जे नॅरेटिव्ह तयार केलं ते सर्व खोटं होतं.
मुस्लीम कुटुंबीयांच्या खाल्ल्या मीठाला ‘मोदी’ जागणार का?
व्होट जिहाद म्हणजे नक्की काय? नरेंद्र मोदी यांनी स्वत: सांगितलं होतं की, त्यांचं बालपण मुस्लीम कुटुंबात गेलेलं आहे. ईदच्या मिरवणुकीत ते जायचे, त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे. मोदींनी अगोदर सांगावे की, ते लहानपणी त्यांनी ज्या मुस्लीम कुटुंबीयांच्या घरचं जेवले त्या मीठाला जागणार आहेत की नाहीत? त्यामुळे, व्होट जिहाद हा शब्द मला काही कळलेला नाही, असा टोला ठाकरेंनी लगावला आहे.
एम फॅक्टर वरुन देखील भाजपवर प्रहार
मराठी मत आम्हाला का कमी का मिळतील? हे सांगावं. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वधर्मीयांनी मतदान केलं आहे. मराठी माणूस मुंबई लुटणाऱ्याला मत देणार का? जर अजूनही भाजपला वास्तवाची जाणीव झाली नसेल तर त्यांना निवडणूक निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेलच, असे देखील ठाकरेंनी नमूद केले.
विधानसभा एकत्रित लढण्याचे केले स्पष्ट
महाविकास आघाडी म्हणून आम्ही विधानसभेतही एकत्रित राहणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. तर इतर घटक पक्ष आणि सामाजिक संघटनांना सोबत घेणार असल्याचे देखीव त्यांनी सांगितले. दरम्यान भाजप आमच्या आघाडीला अनैसर्गिक म्हणत होतं तर आता त्याचं एनडीए सरकार स्थापन होत आहे, ते थोडीच नैसर्गिक आहे, अशी टीका ठाकरेंनी केली.