उद्धव ठाकरे म्हणाले
– भाजपला तडाखा बसल्यानंतर आता ते विषयांतर करीत आहेत. मी पुन्हा एनडीएमध्ये जाणार, असे सांगत आहेत. आपल्याला मातेप्रमाणे असलेल्या शिवसेनेला संपवायला निघालेल्यांसोबत मी कधीच जाणार नाही.
– भाजपचे २०१४ आणि २०१९ मधील निवडणुकांमधील फोटो पाहा. त्या वेळी त्यांच्यासोबत चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार नव्हते. मात्र, आता त्यांच्यासोबत भाजपने अनैसर्गिक युती केली आहे. हे कसले हिंदुत्ववादी आहेत?
– आम्ही काय आहोत ते या मुस्लिम समजाला माहिती आहे. आम्ही पाठीत वार करणारे नव्हे, तर समोरून वार करणारे आहोत.
आपण भाजप; तसेच मोदी अजिंक्य नाहीत, हे जगाला दाखवले आहे. मोदींचे पाय मातीचेच आहेत हेसुद्धा दाखवले आहे. आता हार-जीत होत असतेच; पण मी हिंमत हरणार नाही आणि तुम्हालाही हिंमत हारू देणार नाही. काही ठिकाणी आपला झालेला पराभव माझ्या जिव्हारी लागलाय आणि त्याचा वचपा मी घेतल्याशिवाय राहणार नाही.
उद्धव ठाकरे यांची राज ठाकरे, फडणवीसांवर टीका
उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण दिसले. काही लोकांनी तर उद्धव ठाकरे नको म्हणून ‘बिनशर्ट’ पाठिंबा दिला. उघड पाठिंबा म्हणजेच ‘बिनशर्ट’ पाठिंबा असतो.’
भाजपने महाराष्ट्रात दिलेले नवीन प्रभारी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हे मंत्री म्हणून नालायक आहेत. देशाच्या मंत्र्यांना पक्षाचे काम दिले जात असेल, तर मग देशाचे काम कोण करणार, रेल्वेचे अपघात होणार नाही तर काय होणार, असा सवालही त्यांनी केला. या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता ‘पुन्हा येईन’ म्हणणाऱ्यांवर ‘जाऊद्याना घरी आता वाजवले की बारा’ असे म्हणण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.