उदय जी, फक्त केसेस टाकू नका; राज ठाकरे यांची साहित्य संमेलनातून कोपरखळी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विश्व मराठी साहित्य संमेलनातून राज्य सरकारला चांगल्याच कोपरखळ्या लगावल्या. मराठी भाषेसाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करता. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत असतो. मराठी भाषेसाठी मी जे सांगेल त्याला ते मदत करणार आहेतच. पण आम्ही जे जे करू त्याला तुम्हीही समर्थन द्या. तेव्हा उदयजी, फक्त केसेस टाकू नका, असा चिमटा राज ठाकरे यांनी काढला. राज ठाकरे यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.

आपण आपल्या भाषेवर ठाम राहिलं पाहिजे. जग त्याच्या नंतरच तुम्हाला दाद देते. फ्रेंच माणसं बघा. इतर देशाशी माणसं बघा. ते आपल्या भाषेशी प्रामाणिक असतात. त्यांना भाषेचा अभिमान वाटतो. आपल्या देशातही काही ठिकाणी असंच आहे. बाकीची राज्य स्वत:च्या भाषेबाबत अभिमान बाळगत असेल तर आपण दुसऱ्या भाषेत का बोलतो? आपली मुलं हिंदीत कशासाठी बोलतात? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

मराठ्यांनी राज्य केलं

या हिंद प्रांतावर आक्रमणं झाली. पण या भागावर सव्वाशे वर्ष फक्त मराठ्यांनी राज्य केलं. इतर कोणीही राज्य केलं नाही. बाकीचे बाहेरून आले. आपण राज्यकर्ते आहोत. आपण राज्य केलं. मग आपली भाषा वृद्धिंगत नाही करायची तर काय करायचे? भाषेसाठी म्हणून मी जे सांगेल त्याला ते (राज्यसरकार) मदत करतील. जे जे आम्ही करू त्याला तुम्ही पाठिंबा द्या. उदय जी (उदय सामंत), तेव्हा फक्त केसेस टाकू नका. आतापर्यंतचा अनुभव सांगितला. बाकी काही नाही. जे करतोय महाराष्ट्रासाठी करतोय. भाषेसाठी करतो. आमच्या परीने करत आहोत. तुमची बौद्धिक मशागत करण्यासाठी बाकीची लोकं बसली आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.

इतिहास म्हणजे काय?

माणसाचं अस्तित्व हे त्या भाषेवर असतं. जमिनीवर असतं. इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे भूगोल. जो भाग मिळवल्यानंतर बनतो तो इतिहास. तुम्ही इतिहास काढून पाहा. सर्व इतिहास काढल्यावर कळेल की कशाला इतिहास म्हणतो. जमीन पायाखालची सरकली तर आपलं अस्तित्वच नाही. त्यामुळे भूगोलाशिवाय इतिहास नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

तर इतिहास न वाचलेला बरा

साहित्य संमेलन होत असतात. पण शहरांमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व दिसलं पाहिजे. त्यासाठी आपण काम केलं पाहिजे. फक्त जमिनीसाठी मराठी माणसांना बेघर केलं जात असेल तर तो विकास नसतो. आपलं अस्तित्व पुसण्याचा तो एक डाव असतो. प्रत्येकाने ही गोष्ट जपली पाहिजे. समजून घेतली पाहिजे. एखाद्या कंपनीने 5 हजार एकर जमीन विकत घेतली याचा अर्थ ती कुटुंब गेली बाहेर. कुठे गेली माहीत नाही. या गोष्टी आपण जपल्या नाही, आपलंच राज्य जपलं नाही, तर आपलं अस्तित्व राहणार नाही. मला वाटतं इतिहासातून बोध घेणार नसू तर इतिहास न वाचलेला बरा, असंही ते म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)