तूर्तास धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाही?, दमानियांचे पुरावे, मुख्यमंत्र्यांची भेट; आता अजितदादानेमकं काय म्हणाले?

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती, त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यानंतर आज अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, या भेटीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत या भेटीत काय निर्णय होणार याबाबत मोठी उत्सुकता होती, त्यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

दमानिया यांनी काही कागदपत्रं माझ्याकडे दिली आहेत. मी ती घेतली पाहिली. मी आज रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतो.  पण त्यांना नागपूरला जायचं असल्यानं मी त्यांना आत्ताच भेटलो. त्यांनी मला सांगितलं तुम्हाला जशा दमानिया भेटल्या तशा त्या मलाही भेटल्या. मलाही त्यांनी काही कागदपत्रं दिले आहेत. या प्रकरणात तीन प्रकारच्या चौकशा सुरू आहेत. एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन. ही कागदपत्रे मी सीआयडी आणि एसआयटीकडे दिली आहेत.  कुणी पुरावे दिले तर त्याची शहानिशा करावी लागते, म्हणून ते सीआयडी आणि एसआयटीकडे देण्यात आले आहेत.  जी वस्तुस्थिती समोर येईल त्यानुसार पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं जाईल, असं मुख्यमंत्री यांनी सांगितल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की,  मी आणि मुख्यमंत्र्यांनी आधीपासूनच सांगितलं. जी घटना सरपंचांच्याबाबत बीड जिल्ह्यात घडली. त्याची चौकशी सुरू आहे. दोषी असतील त्यांना फाशी दिली पाहिजे, तसा प्रयत्न सुरू आहे. चौकशी चालू आहे. कुणाची आणखी नावे आली तर त्यावरही कारवाई केली जाईल. पण कुणाचा संबंधच नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही. संबंध असेल तर कुणालाही पाठी घालणार नाही. ही माझी, मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. माझ्यावर आरोप झाले, तेव्ही मी राजीनामा दिला होता. माझी गोष्ट वेगळी होती. माझ्या वेळी जी घटना घडली होती मला ते असह्य झालं, म्हणून मी राजीनामा दिला. आता चौकशी सुरू आहे. दोषींना पाठिशी घालणार नाही, कारवाई केली जाईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)