लाडकी बहीण योजनेत निधी वळवल्याने संजय शिरसाट संतप्तImage Credit source: TV 9 Marathi
Ladki Bahin Yojana: राज्यातील महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारसाठी अडचणीची ठरत आहे. या योजनेला लागणारा निधी दुसऱ्या खात्यातून वळवला जात आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींकडे वळवल्याने मंत्री संजय शिरसाट प्रचंड संतापले आहेत. या खात्याचा कायदेशीर निधी वर्ग करता येत नाही किंवा त्यात कपात करता येत नाही. परंतु अर्थ खात्याकडून आपले डोके जास्त चालवले जात आहे. सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल किंवा गरज नसेल तर खाते बंद करा, असा संताप सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वित्त विभागाने आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध समुदायांसाठी असलेला निधी वळवला आहे. या बातमीनंतर संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधत नाराजी व्यक्त केली. संजय शिरसाट म्हणाले, माध्यमांमधून मला माझ्या खात्याचे पैसे वर्ग केल्याचे समजले. त्याची मला कल्पना नाही. माहिती नाही. परंतु सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल किंवा गरज नसेल तर सरळ हे खातेच बंद करा. हा अन्याय आहे की कट हे मला माहीत नाही. मात्र, या विषयावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे, असे शिरसाट यांनी म्हटले.
संजय शिरसाट यांनी अर्थ विभागावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, अर्थ विभागाकडून मनमानी सुरु आहे. माझ्या विभागाचा निधी वर्ग किंवा कमी करता येत नाही. याबद्दल काही नियम आहेत का नाही? माझे १५०० कोटींची देणी बाकी आहेत. ते वाढत आहेत. माझे पत्र देणे काम आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा, हे त्यांनी पाहावे. त्यांच्या निर्णय आणि सूचनांची मला कल्पना नाही. सामाजिक खात्याचा निधी वर्ग करता येत नाही, हा कायदा असताना अर्थ विभागातील काही महाभागांकडून हा प्रकार केला आहे. त्यांना असे वाटत की, निधी वळवता येते. कायद्यात पळवापळवी करून निधी घेणे चुकीचे आहे. हे पैसे दलीत भगिनींना दिले, असे म्हणता येत नाही, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
महायुतीच्या १०० दिवसांच्या कामकाजाबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मुल्यमापनावर बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितले की, ही सुरुवात आहे. प्रगती पुस्तक पहिले तर मुखमंत्र्यांकडून अनेकांचे प्रगतीपुस्तक मायनस केले आहे. मला खात्री आहे की, आम्ही आघाडीवर पोहचू. मागील गॅप भरण्याचे काम आम्ही करत आहोत.