विमानतळावर जगभरातुन लोकं विमानातुन प्रवास करतात. विमानाद्वारे प्रवास करणे अगदी सोयीस्कर झाल्याने आपण काही तासातच आपल्या ठिकाणी पोहोचतो. अशातच विमानतळावर लाखो लोकांचा प्रवास सुरू असतो, अशात काही प्रवाशांचे सामान योग्य ठिकाणी पोहोचण्याऐवजी चुकीच्या ठिकाणी पोहोचते तेव्हा अनेक प्रवाशांची तारांबळ उडते. विमानतळावर सामान इकडचे तिकडे झाले तर टेंन्शन वाढते. त्यानंतर सामान कसे शोधायचे हे अनेक प्रवाशाना समजत नाही? विमानतळावरील या समस्येवर मात करण्यासाठी एअर इंडियाने आता एक नवीन मार्ग शोधला आहे. जागतिक विमान कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, एअर इंडियाने आता लोकांच्या सामानांना ट्रॅक करण्यासाठी Apple AirTag वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
एअर इंडियाच्या या निर्णयामुळे आता प्रवासी त्यांच्या अॅपल उपकरणांद्वारे सामानाचे रिअल-टाइम लोकेशन सहजपणे ट्रॅक करू शकतील. आयफोन, आयपॅड आणि मॅकबुकद्वारे एअरटॅगचे लोकेशन ट्रॅक केले जाऊ शकते. तुम्ही काहीही म्हणा, ही नवीन पद्धत प्रवाशांच्या सोयीसाठी खरोखरच उत्तम आहे कारण यामुळे विमान कंपन्यांना प्रवाशांचे हरवलेले सामान परत मिळवून देण्यात खूप मदत होईल.
एअरटॅग असे वापरा
विमानतळावर तुमच्या बॅगेला एक एअरटॅग लावलेला आहे आणि समजा काही कारणास्तव तुमची बॅग सापडली नाही, तर तुम्हाला एअर इंडिया विमानतळ कर्मचाऱ्यांना त्याची तक्रार करावी लागेल, ते Property Irregularity Report येथे तुमची तक्रार दाखल करण्यास मदत करतील. यानंतर, प्रवाशाला Find My अॅपमध्ये शेअर आयटम लोकेशन जनरेट करावे लागेल आणि नंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसोबत लोकेशन लिंक शेअर करावी लागेल.
लोकेशन लिंक अशा प्रकारे शेअर करा
एअरटॅग लिंक शेअर करण्यासाठी, एअर इंडिया अॅपमधील कस्टमर सपोर्ट पोर्टलमधील बॅगेज पर्यायामधील Lost and Found Baggage पर्यायावर जा. एअर इंडिया तुमच्यासोबत ईमेलद्वारे एक लिंक देखील शेअर करेल ज्याच्या मदतीने तुम्ही बॅगचे लोकेशन ट्रॅक करू शकाल. लक्षात ठेवा की Apple AirTag हे फिचर्स iOS 18.2, iPadOS 18.2 आणि macOS 15.2 आणि त्यावरील असलेल्या वर्जनमध्ये चालवणाऱ्या डिव्हाइसेसशी सुसंगत आहे.