१. मुंबईत पुढील ३ ते ४ तासात धो-धो बरसणार
राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून मुंबई, ठाणे, पालघर, पुण्यासह राज्यातील बऱ्याच भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. आज सकाळपासून मुंबई शहरात पावसाची रिपरिप सुरु आहे. तर, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासात मौसमी वारे संपूर्ण राज्य व्यापतील. तसेच, पुढील पाच दिवस राज्यात ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
२. नांदेडमधील पराभवाच्या चिंतनासाठी दानवे-विखेंचा दौरा
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी भाजपचे पक्ष निरीक्षक – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे हे शनिवारी नांदेडमध्ये येणार आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांसह पदाधिकाऱ्यांशी ते बैठक देखील आहेत, मात्र या बैठकीत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण हे गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे. चव्हाणांच्या अनुपस्थितीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीत पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिक बातमी सविस्तर वाचा
३. विवेक कोल्हेंचा बोगसगिरीचा आरोप
नाशिक शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदार व शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या शिक्षणसंस्थेत मोठ्या प्रमाणावर बोगस मतदारांची नोंद झाल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी व अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंनी केला आहे. त्यांच्याकडील ड्रायव्हर, कापड दुकानात काम करणारे कर्मचारी, गॅरेजवरील कर्मचारी, नववी शिक्षण असलेले, अवघे १९ वर्षे वय असलेल्यांचीही शिक्षक मतदार म्हणून नोंदणी झाल्याचा आरोपही कोल्हेंनी केला आहे.
४. राज्य सरकारचा मोठा निर्णय
सफेद शिधापत्रिकाधारकांना महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत योजनेतून मोफत पाच लाखापर्यंतच्या उपचारांच्या सुविधेचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिल्ह्यात ४२ हजार ९४३ पांढरे शिधापत्रिकाधारक असून, त्यामध्ये नोंद असलेल्या एक लाख ८७ हजार ३५५ नागरिकांना हा लाभ मिळू शकणार आहे. अधिक बातमी सविस्तर वाचा
५. वेटिंग लिस्टमधील तिकिटांवर आता प्रवास बंद
मुंबईहून ये-जा करणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून प्रतीक्षायादीतील कन्फर्म नसलेल्या तिकिटांवर रेल्वे प्रवाशांना आता प्रवास करता येणार नाही. आरक्षित डब्यातील गर्दीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मध्य रेल्वेने कठोर पावले टाकली आहेत. आरक्षित डब्यातील गर्दी कमी करण्यासाठी विनातिकीट आणि प्रतीक्षायादीतील प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून प्रवासादरम्यान कोणत्याही स्थानकांवर उतरवण्याची कारवाई सुरू केली आहे.
६. वादळी वाऱ्याने इमारतीवरील पत्रे टर्फवर कोसळले
ठाण्यातील गावंडबाग येथील कोकणीपाडा परिसरात वादळामुळे इमारतीच्या छतावरून कोसळलेला छताचा पत्रा खेळाडू खेळत असलेल्या टर्फवर पडला. या पत्र्याखाली सापडून पाच मुले गंभीर जखमी झाल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री उशीरा घडला.
७. संत निवृत्तिनाथांची पालखी शहराच्या वेशीवर
वरुणराजाच्या चिंब सरी अंगावर झेलत हजारो वारकऱ्यांची पावले गुरुवारी संत निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधी मंदिरापासून पंढरीच्या दिशेने चालती झाली. टाळ-मृदुंगाच्या घोषात हरिनामाचा गजर करीत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी व सोबतच्या ५१ दिंड्यांचे आज (दि. २२) शहरात स्वागत केले जाणार आहे. सकाळी ९ वाजता पंचायत समिती, त्र्यंबकरोड येथे या पालखी सोहळ्याचे प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात येईल.
८. भारत बांगलादेशला हरवून सेमी फायनलमध्ये पोहोचणार का?
भारताने सुपर ८ मधील पहिला सामना जिंकला. आता भारताचा दुसरा सामना हा बांगलादेशबरोबर होणार आहे. भारताने जर हा दुसरा सामना जिंकला तर त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचता येऊ शकते का, याचे समीकरण आता समोर आले आहे. अधिक बातमी सविस्तर वाचा
९. साक्षीचा विजय, महिपतची बेलवर सुटका; रागाच्या भरात…
रलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला साक्षीने कोर्टात तातडीची सुनावणी मागून घेतल्यामुळे अर्जुन आणि चैतन्य कोंडीत सापडलेले असतात. त्यांना कोर्टात जाण्याची मनाई असते त्यामुळे ते कोणतेही हालचाल करू शकत नाही. कोर्टात गेल्यावर त्यांना आत मध्येही घेत नाही त्यामुळे अर्जुन फारच चिडलेला असतो. तेव्हा प्रताप चैतन्य आणि सायली तिघे मिळून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात.
१०. पेन्शनचे ‘नो टेन्शन’; निवृत्तीनंतर पैशांची चिंता आता करू नका
नॅशनल पेन्शन योजनेत (NPS) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पेन्शन फंड रेग्युलेटर (PFRDA) ने सरकारी पेन्शन योजना आणखी आकर्षक करण्यासाठी काही नवीन बदल सुचावले असून यानंतर निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांच्या हातात अधिक पैसा येईल असा दावा पेन्शन नियमकाने केला आहे. NPS योजनेत आता गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळविण्यासाठी इक्विटीचे एक्सपोजर वाढवण्याच्या हालचाली सुरू आहेत.