Today Top 10 Headlines in Marathi: मुंबईत पावसाची आजची स्थिती? तर नार्वेकरांसाठी मतांची जुळवाजुळव; वाचा सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. मुंबईत पावसाची आजची स्थिती काय?

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थीहित लक्षात घेता व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या आज ९ जुलै २०२४ रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौदळे यांनी सांगितले. अधिक बातमी सविस्तर वाचा

२. विक्रमी पावसाने वाताहत

१० वर्षांमधील हा जुलैमधील सांताक्रूझ केंद्रावरील दुसऱ्या क्रमांकाचा विक्रमी पाऊस होता. मुंबईत रविवारी रात्रीनंतर सोमवार सकाळपर्यंत कुलाबा येथे १०० मिलीमीटरहून कमी पाऊस झाला, तर दिवसभरात याची कसर भरून काढत सोमवारी सकाळी ८.३० ते सायं. ५.३० पर्यंत १०२ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. सांताक्रूझ येथे सोमवारी सकाळपर्यंत २६८ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या १० वर्षांमधील हा जुलैमधील सांताक्रूझ केंद्रावरील दुसऱ्या क्रमांकाचा विक्रमी पाऊस होता. याआधी सन २०१९मध्ये २४ तासांमध्ये ३७५ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला होता. रात्रभर पडलेल्या पावसानंतर दिवसभरात मात्र उपनगरात पावसाचा जोर कमी होता. त्यामुळे दिवसभरात केवळ १४ मिलीमीटर पावसाची नोंद सांताक्रूझ येथे झाली.

३. अकोला, बुलढाण्यात कोसळधार

विदर्भात पावसाच्या तुटीने चिंता वाढविलेली असताना अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याला दमदार पावसाचा फटका बसला. रविवारी सायंकाळपासून पावसाचा जोर वाढल्यानेनदी, नाल्यांना पूर आला. या पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने पिके उद्ध्वस्त झाली. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. खामगाव तालुक्यात सुटाळा पुलावरून कार तर पिंपरीत ऑटो वाहून गेला. या तालुक्यातील बारापैकी आठ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

४. नार्वेकरांसाठी मतांची जुळवाजुळव

आगामी १२ जुलैला होणाऱ्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकींसाठी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची विशेष बैठक सोमवारी विधीमंडळात पार पडल्याचे समजते. यात प्रामुख्याने काँग्रेसकडे असणारी अतिरिक्त मते ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्या पारड्यात पडावीत, यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. पाचव्या उमेदवारासाठी भाजपनेही सावध भूमिका घेतली आहे. अधिक बातमी सविस्तर वाचा

५. विधानसभेचा वेगळाच विक्रम

भारतीय संसदीय पद्धतीमध्ये आत्तापर्यंत कधीही न घडलेली एक गोष्ट घडवून महाराष्ट्र विधानसभेने आज एक विक्रम घडविला. अर्थसंकल्पावरील चर्चा थांबवून तातडीने मतदान घेऊन अर्थसंकल्प मंजूर करण्याच्या प्रथेला संसदीय कामकाजामध्ये गिलोटीन म्हणून संबोधले जाते. आजपर्यंत गिलोटीनची वेळ जाहीर केल्यानंतर ती रद्द करण्याचा प्रकार भारतामध्ये कघीही घडला नव्हता. आज मात्र महाराष्ट्र विधानसभेमध्ये गिलोटीन जाहीर केले असताना मतदान न घेताच कामकाज तहकूब करण्याचा विक्रम झाला.

६. पुणेकरांसाठी आनंदाची बातमी!

शिवाजीनगर न्यायालय (सिव्हिल कोर्ट) ते स्वारगेट हा ३.६ किलोमीटर मेट्रोचा भुयारी मार्ग ऑगस्टमध्ये प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन भुयारी मेट्रो स्थानके सुरू केली जातील. त्यानंतर तिसरे मेट्रो स्थानक सुरू केले जाईल,’ अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी दिली.

७. पुण्यापेक्षा भयंकर अपघात, पोलिसांना शहारे

रळी येथील हिट अँड रनचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून ते पाहून हा अपघात पुण्यातील अपघातापेक्षा भयंकर आणि निर्घृण असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. गाडीचे चाक आणि बंपर यात कावेरी नाखवा या अडकल्याची जाणीव होऊनही मुख्य आरोपी मिहीर शहा याने सुमारे दीड किलोमीटर त्यांना फरफटत नेले. त्याचे निर्दयी मन इतक्यावरच थांबले नाही तर कावेरी यांना सोबत असलेला चालक राजऋषी बिडावत याच्या सहाय्याने बाहेर काढले. त्यानंतर त्यांना रस्त्यावर ठेवून राजऋषी याने पुन्हा कार त्यांच्या अंगावर चढवली आणि पसार झाले. अंगावर काटा आणणारे कृत्य करणारा मिहीर अद्याप फरार असून त्याच्या विरुद्ध लूकआउट नोटीस बजावण्यात आली आहे. अधिक बातमी सविस्तर वाचा

८. हरवलेली मुलगी पालकांकडे सोपवली

भरधाव कारच्या धडकेनंतर कारच्या बॉनेटवर पडल्यानंतरही पोलिस मार्शल समाधान कोळी बचावले असते. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता, जखमींना मदत न करता पळून जाण्याच्या वृत्तीने कोळी यांचा जीव घेतला. अपघातानंतर पळून जाण्यासाठी कारचालकाने गाडीचा वेग आणखी वाढवला. त्यात कोळी कारच्या चाकाखाली सापडले. त्यांना त्याच अवस्थेत कारचालकाने काही अंतर फरपटत नेले. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या कोळी यांचा जागीच मृत्यू झाला.

९. टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीरच होणार

भारतीय संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांच्या नावाची चर्चा बऱ्याच काळापासून होत आहे. या आता राहुल द्रविडचा यांचा प्रक्षिशकपदाचा कार्यकाळही संपला. अशा परिस्थितीत बीसीसीआय लवकरच नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा करू शकते. सध्या व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी- २० मालिकेत टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहे.

१०. आयुष्मान खुरानाकडून मिळाली कौतुकाची थाप

एखाद्या भूमिकेच्या ऑडिशनसाठी आधी कलाकारानं नकार दिला आहे आणि त्याला तीच भूमिका मिळाली आहे असं फार कमी वेळा घडताना दिसतं. पण हा किस्सा घडला आहे अभिनेता आणि कन्टेंट क्रिएटर सुशांत घाडगेच्या बाबतीत. ‘शर्मा जी की बेटी’ या सिनेमामध्ये सुशांत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. यासाठी त्यानं सुरुवातीला ऑडिशनसाठी नकार दिला होता. पण नंतर त्याच भूमिकेसाठी त्याची निवड करण्यात आली. युट्यूब आणि सोशल मीडियावरील कन्टेंटमुळे चर्चेत असलेला सुशांत सिनेमाच्या निमित्तानं वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.