१. मुंबईत तुरळक सरीच
शहरात जुलै महिना आला तरी अजूनही पंख्यांचा वेग पूर्ण असून एसीसुद्धा सुरूच आहेत. पावसाची मुंबईतील तुरळक उपस्थिती, वाढलेली आर्द्रता यामुळे उकाड्याने नागरिक हैराण आहेत. मुंबईच्या पावसासाठी कारणीभूत ठरणारी कोणतीही वातावरणीय स्थिती सध्या सक्रिय नसून, त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस अधून-मधून पाऊस पडेल, असा अंदाज आहे. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, अशीही शक्यता आहे. तसेच मंगळवारपासून विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज आहे. अधिक बातमी वाचा सविस्तर…
२. लोकसभेतील पराभवाला भाजप जबाबदार?
सत्ताधाऱ्यांना देशात ४०० जागा मिळणार असल्याचं गृहित धरुन महायुतीचा मतदार लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी सुट्टी साजरी करण्यासाठी गेला आणि म्हणून महायुतीला राज्यात कमी जागा मिळाल्या, अशी मांडणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. विरोधकांच्या नरेटिव्हला प्रयुत्तर देण्यात महायुतीचे नेते कमी पडल्याची कबुली शिंदेंनी दिली. महायुतीमधील पक्षांच्या नेते, पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना शिंदे यांनी लोकसभेतील पराभवाची कारणमिमांसा केली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते.
३. वायकरांच्या ‘क्लीन चिट’वरुन वाक्युद्ध
शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्यावर आरोप असलेल्या पाचशे कोटी रुपयांच्या हॉटेल भूखंड घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात ‘तपास बंद’ अहवाल सादर केल्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. ‘वायकर यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट देणे म्हणजे भाजपच्या वॉशिंग मशिनमधून भ्रष्ट नेत्याला स्वच्छ केल्याचे आणखी एक प्रकरण आहे,’ अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी दिली. अधिक बातमी वाचा सविस्तर…
४. साडेचार किमी रस्त्यासाठी १४ कोटींचा निधी
वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेअंतर्गत असलेल्या ओझरखेडा धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या बाहेरील बाजूने तापी पाटबंधारे विभागामार्फत ओझरखेडा ते माळेगाव या साडेचार किमी रस्त्याचे काम सुरु आहे. डब्ल्यू बि एम (खडीकरण) पद्धतीने अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने अत्यंत निकृष्ठ दर्जाचे बांधकाम करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला आघाडीचे प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केला आहे.
५. आई-वडिलांसोबत लेकाचं भयंकर कृत्य
आई-वडील गोव्याला राहणाऱ्या लहान भावाकडे जाताच मोठ्या मुलाने साथीदारांच्या मदतीने सुमारे ६० लाखांमध्ये दोन प्लॉटची परस्पर विक्री करून फसवणूक केली. आई-वडील नागपुरात परताच मुलाने त्यांना घरात येऊ दिले नाही. त्यामुळे ज्येष्ठांवर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी मुलगा व त्याच्या साथीदारांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
६. बस चालकाला अचानक फिट
ब्रह्मपुरी येथून एसटी बस प्रवाशांना घेऊन चंद्रपूरकडे जात असताना बस चालकाला फिट आल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने पाच वाहनांना धडक देत एका गॅरेजमध्ये शिरली. या घटनेत सहाजण गंभीर जखमी झाले असून सात प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना जिल्ह्यातील सिंदेवाही येथे घडली. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अधिक बातमी वाचा सविस्तर…
७. भरतीसाठी महिला उमेदवार, तान्ह्या बाळाला महिला पोलिसाचा आधार
संपूर्ण राज्यामध्ये सध्या पोलीस भरती सुरू आहे. या पोलीस भरतीला राज्यभरातून उमेदवार दाखल होत आहे. महिला आणि पुरुष या दोन्ही गटांमध्ये ही भरती केली जात आहे. त्यातच पिंपरी चिंचवड परिसरातून एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवाराच्या तान्ह्या बाळाला चक्क महिला पोलीस सांभाळत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर सध्या याची चर्चा सुरू आहे.
८. कॅन्सरशी झुंज देतेय हिना खान
लोकप्रिय अभिनेत्री हिना खानने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अक्षराची भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते. यानंतर ती ‘बिग बॉस ११’ आणि ‘खतरों के खिलाडी’ या रिॲलिटी शोमध्ये दिसली. पुढे एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की २’मध्ये ती कोमोलिकाच्या भूमिकेत दिसली. या मालिकेतून तिने टीव्हीवर पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका साकारली. याशिवाय हिनानेही काही चित्रपटांतून सुद्धा आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध केले. पण आता तिच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच हिनाने ती कॅन्सरशी झुंज देत असल्याचे आपल्या चाहत्यांशी शेअर केले होते.
९. धोनीचा यंदाचा वाढदिवस खास
भारताच्या महान क्रिकेटपटूंपैकी असलेल्या माही म्हणजचे महेंद्रसिंग धोनीचा आज ७ जुलै रोजी वाढदिवस आहे. धोनी आज त्याचा ४३ वा वाढदिवस साजरा करतोय. धोनीच्या वाढदिवसानिमित्त दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ हा सिनेमा थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे. धोनीचे चाहते त्याला त्याच्या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
१०. मोदींचं लीड घटलं, वाराणसीत विश्वासघात
लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात सर्वात मोठा फटका बसला. राज्यात भाजपच्या जागा निम्म्यानं घटल्या आणि पक्ष बहुमतापासून दूर राहिला. राज्यातील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय महामंत्री बी. एल. संतोष यांच्या नेतृत्त्वात एक महत्त्वाची बैठक झाली. त्यात संघटनेतील वरिष्ठ नेत्यांसह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक सहभागी झाले होते.