Today Top 10 Headlines in Marathi: दानवेंवरील कारवाईला कात्री, तर सोलापुरात ओढ्यात म्हशींच्या मृतदेहांचा खच; सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. महायुतीच्या आमदारांविरोधात वातावरण

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं कंबर कसलेली असताना सत्ताधाऱ्यांसोबत असलेल्या लहान पक्षांनी जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मागण्या लावून धरण्यास सुरुवात केली आहे. २०१७ पासून भारतीय जनता पक्षासोबत युती असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाला ६ जागा हव्या आहेत. आमदार विनय कोरेंकडे जनसुराज्य शक्ती पक्षाचं नेतृत्त्व आहे. ते शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्त्व विधानसभेत करतात. अधिक बातमी वाचा सविस्तर…

२. दानवेंवरील कारवाईला कात्री

सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशात रोज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. त्यातच विरोध पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाने वेगळाच वाद उद्भवला होता. विधान परिषदेत आमदाराविषयी अपशब्द वापरल्याबद्दल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने त्यांच्या निलंबनाचा कालावधी पाचवरून तीन दिवस करण्याचा ठराव गुरुवारी मंजूर करण्यात आला. त्यामुळे दानवे हे शुक्रवारपासून कामकाजात सहभागी होऊ शकतील.

३. शिंदेंनी कारवाई केलेलं पुण्यातील हॉटेल आठवड्यात सुरु

प्रादेशिक महानगर विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) कारवाई केलेले भूगाव आणि भुकूम परिसरात अनधिकृत हॉटेल आठवडाभरातच पुन्हा सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही अनधिकृत हॉटेल पुन्हा सुरू झाल्याने हॉटेलचालकांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिल्याचे चित्र आहे.

४ बर्फीवाला पूल अखेर मार्गी

अंधेरीतील गोखले पूल आणि बर्फीवाला उड्डाणपुलाच्या जोडणीवरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला वाद गुरुवारी संपुष्टात आला. या दोन्ही पुलांच्या जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी पाचनंतर बर्फीवाला पुलावरून वाहने पश्चिम ते पूर्व अशी धावू लागली. यानंतर उर्वरित गोखले आणि बर्फीवाला पुलाच्या पूर्व ते पश्चिम बाजूचे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करून तो खुला केला जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. अधिक बातमी वाचा सविस्तर…

५. ‘काम छोटा, दिल बडा’

तरराष्ट्रीय ख्यातनाम विचारवंत शेक्सपियरने म्हटले आहे की, ”आदमी की पहचान काम से होती है, नाम से नही”, अगदी तसाच अवलिया वरवंडमध्ये पालखीत चालत येणाऱ्या वारकऱ्यांना मोफत सेवा देऊन आपली वारी संत तुकाराम महाराज यांना समर्पित करताना दिसतोय.

६. सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा

राज्यातील प्रत्येक नागरिकाला पाच लाख रुपयांचे विमाकवच देताना सरकारने आता रेशनकार्ड आणि एक लाख रुपयांपर्यंतची आर्थिक उत्पन्नाची मर्यादा हे काटेकोर निकष कायम ठेवलेले नाहीत. रेशनकार्ड नसेल तर तहसील कार्यालयातील प्रमाणपत्राची उपलब्धता योजनेचे लाभ देताना ग्राह्य मानली जाणार आहे. या नव्या योजनेमध्ये यापूर्वी असलेल्या महात्मा फुले आणि आयुष्मान भारत योजना संयुक्तपणे राबविण्यात येणार आहेत. पाचपैकी दीड लाख रुपये राज्य सरकारकडून; तर उर्वरित साडेतीन लाख रुपयांची उपलब्धता केंद्र सरकारकडून करण्यात येणार असल्याचे कळते. अधिक बातमी वाचा सविस्तर…

७. २४ म्हशींचा मृतदेहांचा ओढा

उत्तर सोलापूर तालुक्यातील गूळवंची गावाच्या शिवारात असलेल्या ओढ्यात दुर्दैवी घटना घडली आहे.गुरुवारी सायंकाळी पाण्याने भरलेल्या ओढ्यात विजेची तार तुटून पडली होती. फिरत फिरत म्हशी आल्या २४ म्हशी ओढ्यात उतरल्या. या चोवीस म्हशींना विजेचा जबर धक्का बसून ओढ्यातच म्हशींचा मृत्यू झाला. उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथे सायंकाळी हा दुर्दैवी प्रकार घडल्याने गावात ग्रामस्थांची मोठी धावपळ झाली. ओढ्यात उतरणे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे होते महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विजेचा प्रवाह थांबवला आणि तडफडत असलेल्या चार म्हशींना बाहेर काढले. २४ म्हशींचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी सोलापूर बार्शी महामार्गावर रास्ता रोको करून कारवाईची आणि नुकसान भरपाईची मागणी केली.

८. याला म्हणतात नशीब!

४ जुलै २०२४ हा दिवस सगळ्या क्रिकेटप्रेमींसाठी आणि मुंबईकरांसाठी खूपच खास ठरला. भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भव्य विजययात्रेच्या निमित्तानं गुरूवारी मरीन ड्राइव्ह परिसरात रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड मोठी गर्दी झाली होती. खरं तर यात अनेक सेलिब्रिटींनीही आपल्या लाडक्या इंडियन टीमचं कौतुक करण्यासाठी हजेरी लावली होती. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता प्रसाद खांडेकर यानं देखील या विजयी रॅलीचा अनुभव पोस्टमधून शेअर केला आहे.

९. वारीमध्ये शिरले ‘राज’का’रण’

आषाढी वारीसाठी ब्रह्मगिरीच्या कुशीतून निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात यंदा सुरुवातीपासूनच ‘राज’का ‘रण’ची चर्चा विशेषत्त्वाने रंगली आहे. पालखीने पंढरपुरात प्रस्थान ठेवण्याच्या औचित्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये उपस्थिती लावत त्यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले होते. त्यावेळीही नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गावर नाथांच्या विषयापेक्षा मनसेच्याच होर्डिंग्जची चलती जास्त होती.

१०. पगारदारांनो! ITR फाइलिंगसाठी किती शुल्क लागते

जुलैचा महिना सुरू झाला आहे आणि आता येत्या काही दिवसांत ITR (आयकर रिटर्न) दाखल करण्याची अंतिम तारीखही जवळ येणार आहे. दरवर्षीप्रमाणे आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असून अद्याप किती करदात्यांना आयटीआर दाखल केला आहे ज्याची आकडेवारी सीबीडीटीने जाहीर केलेली नाही. आयकर रिटर्न भरण्याचे अनेक मार्ग असून वेगवेगळ्या प्रकारे आयटीआर भरण्याचे नियम आणि त्याचा खर्चही वेगळा आहे. असे करदाते ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही अशा लोकांनी आयटीआर भरण्याची अंतिम मुदत पाळली पाहिजे. प्लॅटफॉर्म आणि ITR दाखल करण्याशी संबंधित खर्चांची माहिती आपण घेऊया.